3 men died after walking 25 km as part of govt job test : सध्याच्या काळात सरकारी नोकरी हा प्रतिष्ठेचा भाग बनला आहे. शिक्षण घेत असलेले तरूण सरकारी नोकरीसाठी जीवापाड मेहनत घेताना पाहायला मिळतात. दरम्यान ओडिशा येथे सरकारी नोकरीसाठी अशीच मेहनत घेत असलेल्या तीन तरूणांचे स्वप्न अर्ध्यातच भंगले आहे.
ओडिशा मधील रौरकेला येथील प्रवीण कुमार पांडा यांनी त्यांचे बीटेक पूर्ण केले आणि एका खाजगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळवली, पण त्यांना सरकारी नोकरी हवी होती. त्यामुळे त्याने राज्य सरकारच्या वनपाल आणि वनरक्षक पदासाठी पदासाठी अर्ज केला आणि वैद्यकीय चाचणी देखील उत्तीर्ण झाला. त्यानंतर भरती प्रक्रियेदरम्यान ३० वर्षीय पांडा याला इतर उमेदवारांप्रमाणे ४ तासांमध्ये २५ किलोमीटर चालण्याची शारीरिक चाचणी देण्यास सांगण्यात आले.
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण जवळपास चार किमी अंतर पूर्ण केल्यानंतर कोसळला. त्यानंतर त्याला सुंदरगड वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. फक्त पांडाच नाही तर २७ वर्षीय व्योमकेश नाईक आणि २६ वर्षीय ज्ञानरंजन जेना या दोघांचा देखील या शारीरिक चाचणीदरम्यान मृत्यू झाला. ही चाचणी ओडिशा सब-ऑर्डिनेट स्टाफ सिलेक्शन कमिशन (OSSC) कडून गेल्या २४ तासांत आयोजित करण्यात आली होती.
तीन उमेदवारांच्या मृत्यूनंतर राज्याचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत देखील जाहीर करण्यात आली आहे .
ओडिशाचे वनमंत्री गणेशराम सिंह खुंटिया यांनी तीन उमेदवारांच्या मृत्यूची चौकशीचे आदेश दिले आहेत. जर चौकशीत कोणी दोषी आढळला तर त्यावर कारवाई केली जाईल असेही त्यांनी जाहीर केले.
वडीलांची प्रतिक्रिया
दरम्यान प्रवीणचे वडील खादल पांडा देखील शारीरिक चाचणीसाठी मुलाबरोबर सुंदरगड येथे आले होते. प्रवीणने वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण केली होती त्यामुळे मुलाला नेमकं काय झालं हे स्पष्ट नसल्याचे म्हटले आहे. “त्याने सर्व वैद्यकीय चाचण्या उत्तीर्ण केल्या होत्या त्यानंतरच त्याला शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली. मला माहिती नाही काय झालं. अधिकार्यांनी मला सांगितलं की माझा मुलगा कोसळला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, जेथे मला तो आपल्यात नसल्याचे सांगण्यात आले,” अशी प्रतिक्रिया खादल पांडा यांनी माध्यमांशी बोलताना दिली. कुटुंबाने बुधवारी प्रवीणचे अंतिम संस्कार केले.
तर मृतांपैकी एक असलेल्या नाईक याने ही चाचणी पूर्ण केली मात्र त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला केओंझार जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला एससीबी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे त्याचा मृत्यू झाला.
पांडा याच्याप्रमाणेच नाईक हा केओंझार जिल्ह्यातील ओस्तापंगा गावातील रहिवासी होता आणि त्याने देखील बीटेकचे शिक्षण पूर्ण केले होते. तो एका लिपिक पदावर काम करत होते आणि चांगल्या नोकरीच्या शोधात त्याने वनपाल आणि वनरक्षक पदासाठी अर्ज केला होता.
दिवसा घेतल्या जाणाऱ्या शारीरिक चाचणीदरम्यान झालेल्या मृत्यूनंतर, ओसएससीने ही चाचणी पहाटे साडेचार वाजल्यापासून घ्यावी अशा सूचना अधिकार्यांना दिल्या आहेत.