देशात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. विविध पक्षांमध्ये युती, आघाड्या आणि जागावाटप निश्चित होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. अशातच आता कर्नाटकमध्ये भाजपा आणि एचडी देवेगौडा यांचा पक्ष जनता दल (सेक्यूलर) यांच्यातील जगावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे. भाजपानं जदयूला तीन जागा देण्याचं निश्चित केलं आहे. जनता दल कर्नाटकातील तीन जागा लढवणार आहे. ज्यामध्ये मंड्या, हसन आणि कोलार या जागांचा समावेश आहे. तसेच बंगळुरु ग्रामीण मधून देवेगौडा यांचे जावई सी. एन. मंजुनाथ हे भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणुकीला उभे राहतील, असं ठरल्याचंही सांगितलं जात आहे. कर्नाटकातील २८ जागांपैकी २० उमेदवारांची यादी याआधी भाजपाने जाहीर केली आहे. त्यानंतर जनता दलाच्या नेत्यांकडून पक्ष नेतृत्वाकडे जागावाटपाबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आम्हाला तीन जागा मिळाल्या नाही तर…

दरम्यान, माजी पंतप्रधान एचडी देवगौडा आणि त्यांचे पुत्र एचडी कुमारस्वामी यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या नियोजनात भाजपा नेते विश्वासात घेत नाहीत, कोणत्याही बैठकीला बोलावले जात नाही आणि हे पक्षासाठी नुकसानकारक आहे, अशी नाराजी व्यक्त केली होती. “आम्हाला तीन जागा मिळाल्या नाही तर आम्ही लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवू”, असा इशाराही त्यांनी दिला होता.

२०१९ लोकसभा निवडणुकीचा निकाल

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने एकूण २८ पैकी २५ जागांवर विजय मिळवला होता तर काँग्रेसला एका आणि जेडीएसला एका जागेवर विजय प्राप्त झाला होता, तर एका जागी अपक्ष उमेदवार निवडून आला होता. दरम्यान त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आली. सध्या जेडीएसला मिळालेल्या तीन जागांपैकी कोलार भाजपाकडे, हसन जेडीएसकडे आणि मंड्या अपक्ष खासदाराकडे आहे.

जागावाटप का थांबलं होतं?

कोलार जागेवरून जेडीएस आणि भाजपा यांच्यातील जागावाटपाच्या चर्चा थांबल्या होत्या. कोलार मागच्या वेळी जिंकल्यामुळे भाजपाला जागा स्वतःकडेच हवी होती. पण जेडीएसने दोन जागांवर समाधान मानणार नसल्याचे स्पष्ट केले होते. या सगळ्यात राज्यातील सत्ताधारी काँग्रेस पक्षाने जेडीएसवर जोरदार टीका केली आहे. ‘प्रादेशिक पक्षाला दोन जागा लढवण्यासाठी भाजपासोबत युती करण्याची काहीही गरज नव्हती, ही लज्जास्पद गोष्ट आहे”, अशी टीका उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 seats for hd deve gowda party as bjp seals karnataka seat deal source spl
Show comments