Bengaluru Sexual Assualt Case : बंगळुरूमध्ये भररस्त्यात एका तरुणीचा विनयभंग करून छळ करून पसार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात बंगळुरू पोलिसांना यश आलं आहे. याकरता पोलिसांनी जवळपास ७०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले अन् अखेर केरळमधील एका दुर्गम गावात येऊन त्यांचा शोध संपला. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

बंगळुरूमधील बीटीएम लेआउट येथील एका गल्लीत एका व्यक्तीने दोन तरुणींचा पाठलाग करत एका मुलीची छेड काढली होती. सीसीटीव्ही फुटेजनुसार त्याने तिला जबरदस्ती स्पर्श केला होता. दुसऱ्या मुलीने यात हस्तक्षेप करताच सदर आरोपी पळून गेला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. दरम्यान, बंगळुरू पोलिसांनी या आरोपीची ओळख पटवून त्याच्या शोधमोहिमेसाठी पाच पथके रवाना केली.

या आरोपीचं नाव संतोष असं असून तो बंगळुरूतील एका जॅग्वॉरच्या कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याने तामिळनाडूच्या होसूर येथे पलायन केले. त्यानंतर तो सालेम आणि कोझिकोड येथे पसार झाला. पण पोलीस त्याच्या मागावर होते. त्याच्या प्रत्येक ठावठिकाणावर पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लक्ष ठेवून होते. तीन राज्यांमध्ये लपल्यानंतर तो अखेर पोलिसांना केरळमधील एका दुर्गम गावात सापडला.

तीन राज्यांतून पोलिसांनी कसा काढला माग

परंतु, याकरता पोलिसांना जवळपास ७०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासावे लागले. यापैकी अनेक कॅमेऱ्यांच्या फुटेजचा दर्जा खराब असल्यामुळे त्यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले होते. परंतु, तरीही या कॅमेऱ्यांच्या मदतीनेच तीन राज्यांमधून पळून गेलेला संतोष पोलिसांच्या हाती लागला. दरम्यान, पोलिसांनी त्याच्याविरोधात मारहाण आणि लैंगिक छळाप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, बंगळुरूतील रस्त्यावर तरुणींची छेड काढण्याचा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांनी याप्रकरणी कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. नागरिकांच्या या प्रश्नांवर राज्यातील गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी केलेल्या वक्तव्याचे अनेक ठिकाणी पडसाद उमटले. मोठ्या शहरांत अशा घटना घडणारच, असं जी परमेश्वर म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे परमेश्वर यांनी नंतर माफीही मागितली.

“माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. मी नेहमीच महिलांच्या सुरक्षिततेबद्दल खूप काळजी घेणारा असा व्यक्ती आहे. मी निर्भया निधीचा महिलांच्या सुरक्षिततेसाठी चांगल्या प्रकारे वापर केला आहे याची खात्री केली आहे. माझ्या विधानाचा विपर्यास व्हावा असे मला वाटत नाही. जर कोणत्याही महिलेच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिी व्यक्त करतो”, असं ते म्हणाले होते.