Foreign Nationals in the US: अमेरिकेतील विदेशी नागरिकांसाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सरकारने नवे नियम लागू केले आहेत. आता अमेरिकेत ३० दिवसांहून अधिक काळ अवैध वास्तव्यास असलेल्या सर्व विदेशी नागरिकांना त्यांची नोंदणी करावी लागणार आहे. यात कसूर करणाऱ्यांना दंड किंवा कारावास भोगावा लागू शकतो. व्हाइट हाऊसने सदर नियम लागू केले आहेत. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यास सुरूवात झाली. अनेकांना लष्करी विमानाद्वारे त्यांच्या देशात परत धाडण्यात आले आहे. त्यानंतर पुन्हा ट्रम्प प्रशासन पुन्हा आक्रमक झाले आहे.
होमलँड सिक्युरिटी विभागाने सदर आदेश काढले आहेत. व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, ३० दिवसांहून अधिक दिवस राहणाऱ्या सर्वांनाच फेडरल सरकारकडून नोंदणी करून घ्यावी लागणार आहे. असे न करणाऱ्यांना कारवासाची शिक्षा किंवा हद्दपारी सारख्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
होमलँड सिक्युरिटीने दिलेल्या निर्देशानुसार, अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्यांनी एक तर स्वतःहून निघून जावे किंवा स्वतः हद्दपार व्हावे. होमलँड सिक्युरिटीच्या एक्स हँडलवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि गृह सुरक्षा विभागाचे सचिव क्रिस्टी नोएम यांना टॅग करत सदर पोस्ट करण्यात आलेली आहे.
सदर पोस्टनुसार, ज्यांना हद्दपार होण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत, त्यांनी अजूनही अमेरिका सोडली नसेल तर त्यांना प्रति दिन ९९८ डॉलरचा दंड भरावा लागेल. तसेच ज्यांनी देश सोडण्याची घोषणा केली आहे, मात्र तसे करण्यास असमर्थ ठरले आहेत, अशांना १००० ते ५००० डॉलर्स दरम्यान दंड भरावा लागू शकतो किंवा कारावासाची शिक्षाही होऊ शकते.
एच-१ बी व्हिसा आणि विद्यार्थी परमिट व्हिसावर काय परिणाम होणार?
ज्या लोकांनी एच-१बी व्हिसा आणि विद्यार्थी म्हणून अमेरिकेत प्रवेश मिळविला आहे, त्यांच्यावर या निर्णयाचा थेट परिणाम होणार नाही. याव्यतिरिक्त असलेल्या इतर विदेशी नागरिकांना मात्र या निर्णयाचा थेट फटका बसेल. एच-१बी व्हिसानुसार नोकरी मिळवून जर ती गमावली असेल आणि ठरलेल्या मुदतीत देश सोडला नसेल तर त्यावर मात्र कारवाई होऊ शकते.
स्वतःहून बाहेर जाणे फायदेशीर आणि सुरक्षित
होमलँड सिक्युरिटीने सांगितलेल्या नियमानुसार स्वतःहून देशाबाहेर जाण्याचा निर्णय लोकांसाठीच फायदेशीर आहे. एकतर अशा व्यक्ती त्यांच्या जाण्यासाठीचा विमानाचा पर्याय निवडू शकतात आणि गुन्ह्यांची नोंद होण्यापासून टाळू शकतात. तसेच जे लोक स्वतःहून देश सोडत आहेत, ते आपापली मिळकत बरोबर नेऊ शकतात आणि त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही. ज्या लोकांना देशाबाहेर जाणे परवाडणारे नाही अशा लोकांसाठी अनुदानित विमानाने घरी जाण्यासाठी सोय केली जात आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जे स्वतःहून अमेरिकेच्या बाहेर जातील त्यांच्या पुन्हा स्थलांतरासाठी अमेरिकेचे दरवाज खुले ठेवेल जाणार आहेत.