भाईपूर येथे जेवार भागात यमुना एक्स्प्रेस-वेवर शुक्रवारी सकाळी २० वाहनांची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात ३० जण जखमी झाले. येथील २४ कि.मी. बिंदूजवळ हा अपघात घडला.
यमुना एक्स्प्रेस-वेवर आग्राच्या दिशेने जाणारी २० वाहने २४ कि.मी. बिंदूजवळ सकाळी एकावर एक अशी आदळली. दाट धुक्यामुळे हा अपघात घडल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
नोईडाहून यूपी रोडवेजची एक बस आग्रा येथे जात होती. पुढे संथपणे जात असलेला मालवाहतुकीचा ट्रक गडद धुक्यामुळे या बसच्या चालकास दिसला नाही व त्याने ट्रकला जोरदार धडक दिली. त्यापाठोपाठ या बसमागून येणारी वाहनेही एकमेकांवर आदळली, असे हा अधिकारी म्हणाला.या दुर्दैवी अपघातातील ३० जखमींना तातडीने एक्स्प्रेस-वेच्या रुग्णवाहिकेतून कैलाश रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात गंभीररीत्या जखमी झालेले भीम सिंह, पोहोप सिंह आणि पवन सिंह यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघातात बहुसंख्य जखमींना फ्रॅक्चर झाले असून १२ जणांना किरकोळ उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.यमुना एक्स्प्रेस-वेवर आपण वाहनांना थांबवून वाहनचालकांना गडद धुक्यामुळे वाहने सावकाशपणे चालवण्याचे आदेश देत होतो. मात्र ही गोष्ट प्रत्येक वाहनचालकाला सांगणे शक्य नव्हते, असेही हा पोलीस अधिकारी म्हणाला.