उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील पुरोला गावात धर्मांतर होत असल्याचा आरोप करत गावातील ३० युवकांनी नाताळच्या कार्यक्रमावर हल्ला केला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली असून यामध्ये चर्चच्या प्रमुखांचाही समावेश आहे.
हेही वाचा – मुंबईतील महिलेच्या धमकीला घाबरून त्याने आई व बायकोला पाजलं विष; Video करत सांगितलं, “ती’ पॉर्नस्टार..”
पुरोला गावांत शुक्रवारी दुपारच्या सुमारास नाताळ निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान जबरदस्ती धर्मांतर केले जात असल्याचा आरोप करत गावातील ३० युवकांनी लाठ्या घेऊन ‘होप आणि लाईफ’ या सेंटवर हल्ला केला. हे युवक विविध हिंदू संघटनांशी संबंधित असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली असून यामध्ये युनियन चर्चचे प्रमुख लाजर कुरनेलियुस आणि त्यांच्या पत्नीचाही समावेश आहे. दोन्ही गटाशी चर्चा केल्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना सोडून दिले. दरम्यान, यापूर्वीदेखील गावातील अल्पसंख्यकांवर अशाच प्रकारे हल्ले झाल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.