मागील काही काळापासून पाकिस्तान आर्थिक समस्यांचा सामना करत आहेत. प्रचंड महागाई वाढल्याने तेथिल जनता हवालदिल झाली आहे. सरकारच्या तिजोरीतही खडखडाट आहे. त्यामुळे पाकिस्तान आर्थिक मदतीसाठी परकीय देशांकडे मदत मागत आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना पाकिस्तानमधील एका अज्ञात व्यक्तीने टर्की आणि सीरीया देशातील भूकंपग्रस्तांसाठी ३० मिलियन डॉलर अर्थात २४८ कोटी रुपये दान केले आहेत. संबंधित व्यक्तीने अमेरिकेतील टर्की दूतावासात जाऊन गुप्त पद्धतीने २४८ कोटी रुपये दान केले.
पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, “एका अज्ञात पाकिस्तानी व्यक्तीने अमेरिकेतील टर्की दूतावासात जाऊन टर्की आणि सीरियातील भूकंपग्रस्तांना ३० दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली. त्या व्यक्तीचं मोठं मन पाहून खूप प्रभावित झालो. हे परोपकाराचं अद्भूत उदाहरण आहे. यामुळे मानवतेवर येणाऱ्या संकटांवर मात करण्यास आपल्याला सक्षम करते.”
शरीफ यांच्या या ट्विटनंतर देशातील लोकांनी त्यांच्यावरच निशाणा साधला आहे. पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यातून देशाची सुटका करण्यासाठी अज्ञात देणगीदार पाकिस्तानी दूतावासात का गेला नाही? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे. शरीफ यांचं हे ट्वीट वेगाने व्हायरल होत आहे. शिवाय २४८ कोटी रुपये दान करणारी अज्ञात व्यक्ती नेमकी कोण आहे? याबाबतही तर्क वितर्क लावले जात आहेत.