खान युनिस
गाझातील सर्वात मोठय़ा शिफा रुग्णालयातून मुदतपूर्व जन्म झालेल्या तीस शिशूंना हलवण्यात आले असून त्यांना इजिप्तमधील रुग्णालयांमध्ये ठेवण्यात येईल, असे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
याच वेळी, इस्रायली फौजांनी इतर रुग्णांना हलवण्याची मुभा दिल्यानंतर, या रुग्णालयात २५९ रुग्ण उरले असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या चमूने रविवारी सांगितले. या उर्वरित रुग्णांमध्ये अत्यंत गंभीर स्थितीतील, तीव्र संसर्गित जखमांच्या वेदना असलेले रुग्ण, तसेच हालचाल करण्यास असमर्थ असलेल्या पाठीच्या कण्याला इजा झालेल्या रुग्णांचा समावेश आहे.
हेही वाचा >>> भारताशी केलेल्या करारांचा मालदिवकडून आढावा; नवे अध्यक्ष मोहमद मुइझ्झू यांची भूमिका
सुमारे २५०० विस्थापित लोक, फिरते रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचारी हे शनिवारी सकाळी या रुग्णालयाच्या विस्तीर्ण परिसरातून बाहेर पडल्याची माहिती या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिली. २५ वैद्यकीय कर्मचारी रुग्णांसोबतच थांबल्याचेही त्यांनी सांगितले.
शिफा रुग्णालयाच्या आतील भागात आणि खाली हमासची विस्तीर्ण चौकी असल्याचा इस्रायलचा आरोप आहे.
इस्रायलशी संबंधित जहाज हौथी बंडखोरांच्या ताब्यात
जेरुसलेम : इराणची फूस असलेल्या येमेनच्या हौथी बंडखोरांनी रविवारी लाल समुद्रातील मालवाहतूक मार्गावर इस्रायलशी संबंधित एक महत्त्वाचे मालवाहू जहाज ताब्यात घेतल्याचा दावा इस्रायलने केला. इस्रायलच्या दाव्यामुळे प्रदेशातील सागरी क्षेत्रातही तणाव निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.