देशात नव्या करोनाबाधितांच्या संख्येत सोमवारी घट झाली आहे. देशातील गेल्या २४ तासांमध्ये ३० हजार २५६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच एका दिवसात २९५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ४ लाख ४५ हजार १३३ जणांना करोनामुळे आपला जीव गमावला आहे. रविवारच्या तुलनेत (१९ सप्टेंबर) या संख्येत १.६ टक्क्यांनी घट झाली आहे. दरम्यान, केरळची चिंता कायम आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत केरळमध्ये दररोजच करोनाच्या नव्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत केरळमध्ये १९ हजार ६५३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात १५२ जणांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी (२० सप्टेंबर) सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार; दिलासादायक बाब अशी की, गेल्या २४ तासांत देशात ४३ हजार ९३८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील करोनामुक्तांचा एकूण आकडा आता ३ कोटी २७ लाख १५ हजार १०५ वर पोहोचला आहे.देशातील करोनाची सक्रिय अर्थात ऍक्टिव्ह प्रकरणं एक टक्क्यापेक्षा कमी आहेत. तर, सद्यस्थिती ३ लाख १८ हजार १८१ रुग्ण देशातील विविध रुग्णालयांमध्ये करोनावर उपचार घेत आहेत.

‘या’ राज्यांत करोनामुळे एकही मृत्यू नाही

महाराष्ट्रातील करोना स्थितीचा आढावा घेतल्यास, राज्यात गेल्या २४ तासांत ३ हजार ४१३ नव्या करोना रुग्णांची नोंदणी झाली आहे. तर ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये दिल्लीमध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसून २८ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या २४ तासांत देशातील राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश अशा चार मोठ्या राज्यांमध्ये करोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. त्याचसोबत, उत्तराखंड आणि झारखंडमध्येही करोनामुळे मृत्यूची नोंद नाही.

एकूण ८०.८५ कोटी नागरिकांना लसीचे डोस

देशाच्या लसीकरण कार्यक्रमाविषयी जाणून घ्यायचं झालं तर, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण ८०.८५ कोटी नागरिकांना करोनाप्रतिबंध डोस देण्यात आले आहेत. तर, यापैकी ३७ लाख ७८ हजार २९६ नागरिकांना गेल्या २४ तासांमध्ये डोस देण्यात आले आहेत.