मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३० वर्षीय महिलेवर चालत्या ट्रेनमधये तीन वेळा बलात्कार करण्यात आला. ही घटना सतना जिल्ह्यात रविवारी रात्री घडली. पीडित महिलेने आरोपीकडून कसाबसा स्वतःचा बचाव केला. तिला अर्ध्या कपड्यात आणि अनवाणी चालत्या ट्रेनमधून उडी घ्यावी लागली. २२ वर्षीय आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी एका मोकळ्या डब्यात स्वतःला कोंडून घेतले होते. मात्र तीन तासांच्या मेहनतीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आरपीएफ जवानांनी शर्थीचे प्रयत्न केल्यामुळे आरोपीला तात्काळ अटक करण्यात यश आले.
सतना रेल्वे पोलिस अधिकारी एलपी कश्यप यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला एका पॅसेंजर ट्रेनमधून प्रवास करत होती, तिला सतना जिल्ह्यातील उचेहरा येथे जायचे होते. पॅसेंजर ट्रेन पकरिया रेल्वे स्थानकात उभी असताना समोरच्या प्लॅटफॉर्मवर एक मोकळी एसी ट्रेनही उभी होती. महिलेला प्रसाधनगृहाचा वापर करायचा असल्यामुळे ती समोरच्या ट्रेनमधील प्रसाधनगृहाकडे गेली. या दरम्यान पॅसेंजर ट्रेनमध्ये असलेला आरोपी तिचा पाठलाग करत मागे मागे गेला.
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार पकरिया स्थानक ते मेहर रेल्वे स्थानकादरम्यान ४० किमीचे अंतर आहे. या दरम्यान महिलेवर तीन वेळा बलात्कार करण्यात आला. पीडितीने तक्रारीदरम्यान सांगितले की, जेव्हा ती पॅसेंजर ट्रेनमध्ये होती, तेव्हापासूनच आरोपी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. पण तो तिच्यामागे एसी ट्रेनमध्ये येईल, याची तिला कल्पना नव्हती. एसी कोचमध्ये गेल्यानंतर आरोपीने मागून डोक्यावर जोरदार फटका मारल्यामुळे ती खाली कोसळली आणि आरोपीने तिच्यावर दुष्कृत्य केले.
पाणी मागण्याच्या बहाण्याने केली सोडवणूक
सदर एसी कोच ट्रेन मेहर स्थानकावर पोहोचली असताना पीडित महिलेने आरोपीकडे पाणी मागितले. आरोपी पाणी आणण्यासाठी स्थानकावर उतरला असताना पीडितेने कसेबसे तिथून पळ काढला. यावेळी तिने आपली साडी, सँडल आणि बॅगही तिथेच टाकली. अर्धनग्न अवस्थेत स्टेशनवर उपस्थित असलेल्या आरपीएफ शिपायाला सदर हकीकत सांगून पीडितेने आरोपीला पकडण्याची विनंती केली. तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. आरपीएफ जवानाने ट्रेनमध्ये धाव घेत आरोपीचा माग काढला. जवानाला पाहून आरोपीने स्वतःला एका डब्यात कोंडून घेतले.
जबलपूर आरपीएफ अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडिताने आम्हाला माहिती दिली. तोपर्यंत ट्रेन सुरू झाली होती. आमचा एक जवान त्या ट्रेनमध्ये चढला, त्यामुळे आरोपीला पळता आले नाही. तो एका डब्यात बंद होता. आम्ही पुढच्या स्टेशनला ट्रेन थांबविण्याची माहिती देऊन रस्ते मार्गाने तिथे पोहोचलो. ट्रेन जेव्हा रिवा स्टेशनवर थांबली तेव्हा तांत्रिक पथकाला घेऊन दरवाजा उघडण्यात यश आले. रात्री ११.३० वाजता आरोपीला अटक करण्यात आली. जर आरपीएफ जवान धावत जाऊन डब्यात चढला नसता तर वाटेत आरोपी निसटू शकला असता, असेही त्यांनी सांगितले.