वेस्ट पाम बीच (अमेरिका) : अमेरिकेने शनिवारी रात्री येमेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये ३१ जण ठार झाल्याची माहिती हुती बंडखोरांनी दिली. मृतांमध्ये महिला व लहान मुलांचाही समावेश आहे. त्याशिवाय १००पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचेही हुतींकडून रविवारी सांगण्यात आले. मृतांमध्ये किमान १८ सामान्य नागरिक होते असा दावा त्यांनी केला.

दुसरीकडे, आपण येमेनमधील हुतींच्या ताब्यातील प्रदेशावर हवाई हल्ले करण्याचे आदेश दिले असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. येमेनभोवतीच्या लाल समुद्र, एडनचे आखात आणि अरबी समुद्र या सागरी मार्गांनी जाणाऱ्या व्यापारी जहाजांवरील हल्ले थांबवले जात नाहीत तोपर्यंत हुतींवर हल्ले सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला. गाझामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर हुती बंडखोरांनी व्यापारी जहाजांवर हल्ले करायला सुरुवात केली. ते थांबवावे असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.