नैऋत्य चीनमधील कनमिंग या रेल्वे स्थानकात दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यांत किमान ३३ जण ठार तर १३० जण जखमी झाले. अज्ञात हल्लेखोरांनी सुऱ्या आणि तत्सम शस्त्रांस्त्रांद्वारे हा हल्ला केला असला तरी यामागे इस्लामी दहशतवाद्यांचाच हात आहे, असा आरोप चिनी सरकारतर्फे करण्यात आला आहे. तर, ‘हा हल्ला म्हणजे चीनवरील ९/११च असल्याचे’ चीनमधील प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
शनिवारी स्थानिक प्रमाण वेळेनुसार रात्री ९ वाजता युनान प्रांतातील कनमिंग रेल्वे स्थानकात काळे कपडे घातलेले काही अज्ञात हल्लेखोर शिरले. त्यांच्याजवळ सुऱ्या आणि तत्सम धारदार शस्त्रे होती. या हल्लेखोरांनी स्थानकातील बेसावध प्रवाशांवर हल्ला चढवला. हल्ल्याच्या पद्धतीवरून तो पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होत होते, असे बीजिंगच्या पोलीस सूत्रांनी सांगितले. या हल्ल्यांत ३० नागरिक ठार झाले, तर १३० जण जखमी झाले.
पुढील आठवडय़ात चीनच्या लोकप्रतिनिधीगृहाचे अधिवेशन सुरू होणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर हा हल्ला करण्यात आला आहे किंवा कसे, याची चौकशी करण्याचे आदेश पंतप्रधान ली केकियांग यांनी दिले आहेत.  झिंजियांग प्रांतातील अल कायदाशी निगडित असलेली ‘तुर्कस्तान इस्लामिक मूव्हमेंट’ ही संघटना या हल्ल्यांमागे असावी, अशी शक्यता  तज्ज्ञांनी वर्तवली आहे. चीनमधील दुर्गम भागात मुस्लीम उयघुर आणि हान चिनी यांच्यात वांशिक संघर्षही गेली काही वर्षे वाढत चालल्याची पाश्र्वभूमी या हल्ल्यांना आहे.
कारण, हल्लेखोर अज्ञातच
चीनमधील युईघुर प्रांतात असलेल्या दहशतवादी गटांपैकीच एखादा कट्टरपंथीय इस्लामी गट या हल्ल्यामागे असावा, असा पोलिसांचा कयास आहे. त्याच दृष्टीने अनेक संशयितांना ‘ताब्यात’ घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे या हल्ल्याचा कट रचणाऱ्या अनेकांना प्रत्यक्ष हल्ल्यादरम्यान रेल्वे स्थानकातच गोळ्या घालण्यात आल्याचे पोलीसांनी म्हटले आहे, मात्र त्यांची अद्याप ओळख पटू शकलेली नाही.
तिखट प्रतिक्रिया
‘कनमिंग रेल्वे स्थानकातील नागरिकांची कत्तल म्हणजे चीनचे ९/११च आहे. यामुळे संपूर्ण देशभरात उद्वेगाची भावना पसरली असून चीनमधील फुटीरतावादी शक्तींवर वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे’, अशी अपेक्षा चीनमधील सरकारी मालकीची वृत्तसंस्था असलेल्या झिनुआ या वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
 दहशतवाद्यांना ठेचून काढा..
३३ जणांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना ठेचूनच काढण्यात यावे, त्यांची जराही हयगय केली जाऊ नये, अशी एकमुखी मागणी देशातील सर्व लोकप्रतिनिधींनी चिनी सरकारकडे केली आहे. या हल्ल्याविरोधात सर्वानीच कंबर कसून एकत्र यायला हवे, असे आवाहन चीनमधील विविध गटांनी केले आहे. सरकारी प्रवक्त्यांनीही या हल्ल्यांमागे चीनमधील इस्लामी मूलतत्त्ववादी असल्याचा आरोप केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा