३० ऑक्टोबरच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या गांधीनगरमधून ‘राम नाम मंत्र लेखन यज्ञ’ याची सुरुवात केली. या मोहिमेच्या अंतर्गत गुजरातच्या सोमनाथ मंदिर परिसरातील राम मंदिरातल्या पोथ्यांमध्ये प्रभू रामाचं नाव लिहिलं जातं आहे. या पोथ्या २०२४ मध्ये २२ जानेवारीच्या दिवशी अयोध्येत पाठवल्या जाणार आहेत. राम मंदिरासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या रथयात्रेनंतर ३३ वर्षांनी अशा प्रकारची मोहीम राबवली जाते आहे. २३ ऑक्टोबर १९९० या दिवशी लालू प्रसाद यादव यांच्या सरकारने लालकृष्ण आडवाणींना अटक केली होती. ज्यानंतर राम मंदिराची रथयात्रा अचानक थांबली होती. त्यानंतर राम मंदिरासाठी ही विशेष मोहीम राबवली जाते आहे.

सोमनाथच्या राम मंदिरात भक्तांसाठी ठेवण्यात आल्या १० पोथ्या

सोमनाथ मंदिर ट्रस्टने १० पोथ्यांची व्यवस्था केली आहे. या पोथ्यांमध्ये भक्तांनी राम नाम लिहायचं आहे. राम मंदिर आणि बाबरी मशिद यांच्यातला वाद जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा वाद सुरु होता तेव्हा सोमनाथ मंदिर विश्वस्त मंडळाने सोमनाथ मंदिराच्या समोर असलेल्या त्रिवेणी संगमावर राम मंदिर बांधलं होतं. २०१७ मध्ये या मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं होतं.

अयोध्येला जाणाऱ्या भक्तांसाठी विशेष बसची योजना

सोमनाथ मंदिर विश्वस्त मंडळाने अयोध्येला जाणाऱ्या भक्तांसाठी विशेष बसची योजनाही आखली आहे. सोमनाथ मंदिर ते राम मंदिर अशी बस सेवा सुरु केली जाणार आहे. ठराविक वेळाने या बस सोडल्या जाणार आहेत. या विश्वस्त मंडळाने असंही सांगितलं आहे की जे भक्त पोथ्यांमध्ये राम नाम लिहितील त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

गुजरातमध्ये भाजपाने या मोहिमेच्या अंतर्गत २४ जानेवारीला प्रत्येक गावात उत्सव साजरा करण्याचं ठरवलं आहे. वेरावलचे येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी पदाधिकारी आणि राज्य भाजपा सचिव झवेरीभाई ठकरार यांनी सांगितलं की राम हे तर आपल्या प्रत्येकाच्या हृदयतात आहेत. राम मंदिराचं उद्घाटन होणं ही ५७६ वर्षांच्या लढाईच्या विजयाचं प्रतीक आहे. हिंदुत्व काय आहे हे लोकांना कळलं पाहिजे यासाठी राम रथ यात्रा काढण्यात आली होती. आता राम मंदिराचं उद्घाटन होताना प्रत्येक गावात उत्सव साजरा झाला पाहिजे. आम्ही त्यासाठी सर्वतोपरी तयारी करतो आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं. इंडियन एक्स्प्रेसने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

Story img Loader