लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने १६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील १९५ उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीमधून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुसऱ्यांदा गांधीनगरमधून, तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पारंपरिक लखनौमधून निवडणूक लढवतील. या यादीमध्ये ३४ मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री, २८ महिला आणि सर्वाधिक ५७ ओबीसी उमेदवारांचा समावेश आहे.

दिल्लीत गुरुवारी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत प्रामुख्याने ‘अ’ आणि ‘ड’ वर्गवारीतील लोकसभा मतदारसंघांची घोषणा करण्यात आली होती. पक्ष केवळ भाजपचीच नव्हे तर ‘एनडीए’ची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे भाजपलाच नव्हे, तर देशातील जनतेला ‘फिर एक बार मोदी सरकार’ सत्तेवर आलेले हवे आहे, राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा >>> घराणेशाहीला निवडणुकीची भीती; पंतप्रधान मोदी यांची बिहारमधील सभेत राजद, काँग्रेसवर टीका

मंडाविया, राजीव चंद्रशेखर, ज्योतिरादित्य यांना संधी

गुजरातमधील पोरबंदरमधून केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, केरळमधील थिरुवनंथपूरममधून केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर, राजस्थानमधील अलवरमधून केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंदर यादव आणि केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना पारंपरिक गुना मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीयमंत्री सर्बानंद सोनोवाल यांना आसाममधील दिब्रुगढमधून तर व्ही. मुरलीधरन यांना केरळमधील अट्टिंगळमधून संधी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या सदस्या आणि महाराष्ट्राच्या माजी प्रभारी सरोज पांडे यांना छत्तीसगढमधील कोरबा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.

अमेठीतून स्मृती इराणींना पुन्हा संधी

अमेठी मतदारसंघातून केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांना, तर मथुरामधून हेमामालिनी, गोरखपूरमधून रवीकिशन यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. याशिवाय, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना अरुणाचल प्रदेश पूर्व, गोवा- उत्तरमधून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राजकोटमधून पुरुषोत्तम रुपाला, नवसारीमधून मोदींचे विश्वासू सी. आर. पाटील, जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमधून जितेंद्र सिंह, झारखंडमधील गोड्डामधून निशिकांत दुबे याशिवाय, केंद्रीयमंत्री अर्जुन मुंडा, मध्य प्रदेशच्या मंडलामधून फग्गनसिंह कुलस्ते, राजस्थानातील बिकानेरमधून अर्जुनसिंह मेघवाल, कोटामधून लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे. तेलंगणा करीम नगरमधून संजय बंडी, तर सिकंदराबादमधून केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी उमेदवार असतील. लखीमपूर खिरीतील शेतकरी हत्याकांडामुळे वादग्रस्त ठरलेले केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय टेनी यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> तपासासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करा; बंगळुरू स्फोट प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश

दोन माजी मुख्यमंत्री उमेदवार, प्रज्ञा ठाकूर यांना वगळले

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना विदिशा या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिल्पव देब यांना त्रिपुरा पश्चिम मतदारसंघातून पहिल्यांदाच संधी दिली आहे. देब राज्यसभेचे सदस्य आहेत. भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर यांना वगळण्यात आले असून त्यांच्या जागी अलोक शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.

दिल्लीत बांसुरी स्वराज रिंगणात

भाजपने २०१९ मध्ये दिल्लीतील सातही जागा जिंकल्या होत्या. यावेळी आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाली असल्यामुळे भाजपने नवे चेहरे देऊन विद्यामान खासदारांच्या विरोधी जनमताला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या यादीमध्ये पाच उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून चार नवे उमेदवार देण्यात आले आहेत. नवी दिल्लीतून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी स्वराज यांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी आणि रमेश बिधुडी, माजी केंद्रीयमंत्री हर्षवर्धन, हंसराज हंस यांना डच्चू देण्यात आला आहे. केवळ मनोज तिवारी यांना पुन्हा संधी दिली गेली आहे.

रितेश पांडे, गीता कोडा, अनिल अॅण्टनींना उमेदवारी

बसपमधून आलेले विद्यामान खासदार रितेश पांडे यांना आंबेडकरनगरमधून तर, काँग्रेसमधून आलेल्या झारखंडमधील खासदार गीता कोडा यांना सिंहभूम मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए. के. अॅण्टनी यांचे पुत्र अनिल अॅण्टनी यांना बक्षीस देण्यात आले असून ते केरळमधील पत्तनमतिट्टा मतदारसंघातील उमेदवार असतील. तेलंगणातील बीआरएसमधून आलेले बी. बी. पाटील यांना जहिराबादमधून उमेदवारी दिली आहे.

गौतम गंभीर, जयंत सिन्हा गळाले

विद्यामान खासदार जयंत सिन्हा व गौतम गंभीर यांनी निवडणुकीच्या कर्तव्यातून मुक्त होण्याची विनंती पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना केली असल्याने त्यांच्या नावांचा विचार करण्यात आलेला नाही. यावेळी ३०-४० टक्के विद्यामान खासदारांना डिच्चू दिला जाण्याची चर्चा होती, त्यांत या दोघांचीही नावे होती. त्यामुळेच त्यांनी आधीच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे.

रिंगणातील केंद्रीय मंत्री

० अमित शहा, राजनाथ सिंह, स्मृती इराणी, किरेन रीजिजू, सर्बानंद सोनोवाल, श्रीपाद नाईक, पुरुषोत्तम रुपाला, मनसुख मंडाविया, जितेंद्र सिंह, अर्जुन मुंडा, व्ही मुरलीधरन, राजीव चंद्रशेखर, ज्योतिरादित्य शिंदे, फग्ग्नसिंह कुलस्ते, अर्जुनसिंह मेघवाल, भूपेंद्र यादव, गजेंद्रसिंह शेखावत, कैलाश चौधरी, जी. किशन रेड्डी, अजय टेनी, अजय भट, सत्यपाल सिंह बघेल, साध्वी निरंजन ज्योती, निशिथ प्रामाणिक, महेंद्रनाथ पांडे, पंकज चौधरी, अन्नपूर्णा देवी, संजीव बालियान, शांतनू ठाकूर, सुभाष सरकार, भानू प्रताप सिंह वर्मा, कौशल किशोर, देवूसिंह चौहान,

●१६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेश

राज्यनिहाय उमेदवारांची संख्या : उत्तर प्रदेश- ५१, पश्चिम बंगाल- २०, मध्य प्रदेश-२४, गुजरात-१५, राजस्थान-१५, केरळ-१२, तेलंगणा-०९, आसाम-११, झारखंड-११, छत्तीसगढ-११. दिल्ली-०७. जम्मू-काश्मीर-०२, उत्तराखंड-०३, अरुणाचल प्रदेश-०२, गोवा०१, त्रिपुरा-०१, अंदमान-निकोबार-०१, दीव-दमण-०१.

महाराष्ट्राचा समावेश नाही

भाजपने ज्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांशी आघाड्या केल्या आहेत, त्या राज्यांचा निवडणूक समितीच्या बैठकीत विचार करण्यात आला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही. समितीची पुढील बैठक ४-५ मार्च रोजी होणार आहे.

कृपाशंकर उत्तर प्रदेशातून

महाराष्ट्रातील एकाही जागेवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही. महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचा पहिल्या यादीत समावेश झालेला नसला तरी, पूर्वाश्रमीचे प्रदेश काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांचे भाजपने पुनर्वसन केले असून त्यांना उत्तर प्रदेशमधील जौनपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

●३४ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री व लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांचा समावेश.

●२८ महिला उमेदवारांना प्राधान्य.

●५० पेक्षा कमी वयोगटातील युवा ४७ उमेदवारांना संधी

●अनुसूचित जातीतील २७ तर अनुसूचित जमातीतील १८ उमेदवार.

●ओबीसी उमेदवार ५७.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 34 union ministers name in bjp first list pm modi to contest from varanasi zws