Indias Youngest Billionaires : २०२५ मधील भारतातील सर्वात तरूण अब्जाधीश हे रेझरपे चे सहसंस्थापक शशांक कुमार आणि हर्षिल माथूर हे दोघे ठरले आहेत. हे दोघेही अवघ्या ३४ वर्षांचे आहेत आणि ‘हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२५’ नुसार यांची प्रत्येकी संपत्ती ही ८,६४३ कोटी रुपये इतकी आहे.

चीनमधील सर्वात तरूण अब्जधीश वांग झेलाँग याच्याशी तुलना केली तर २९ वर्षीय वांग याचे संपत्ती ८,६४३ कोटी रुपये इतकी आहे. वांग यांना सीएनएनसी हुआ युआन टायटॅनियम डायऑक्साइड कंपनीचा हिस्सा वारशाने मिळाला आहे.

दोघेही आयआयटी रुडकीचे विद्यार्थी

भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश असलेले कुमार आणि माथूर हे आयआयटी रुडकी येथील विद्यार्थी आहेत आणि या दोघांनी २०१४ साली बंगळुरू येथे रेझरपेची स्थापना केली होती. या दोघांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, रेझरपेच्या आधी कुमार यांनी सॉफ्टवेअर डेव्हलपर इंजिनियर म्हणून मायक्रोसॉफ्ट कंपनीत काम केले आहे. तर माथूर यांनी शुम्बर्गर (Schlumberger) येथे वायरलाइन फिल्ड इंजिनियर म्हणून काम केले.

माथूर यांनी त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलवर लिहिले आहे की, त्यांनी भारतातील ऑनलाईन पेंमेंट्सची भयाण अवस्था पाहिल्यानंतर रेझरपेची सुरूवात केली.

२०२१ च्या शेवटापर्यंत रेझपेने ७.५ अब्ज डॉलर्सच्या व्हॅल्युएशनसह सीरिज-एफ फंडिंग राउंड पर्यंत ३७५ दशलक्ष डॉलर्स उभे केले. तसेच याला सिंगापूरच्या सिंगापोरियन सोव्हेरिन फंड जीआयसी , Sequoia, रिब्बीट कॅपीटल, टायगर ग्लोबल मॅनेजमेंट, मॅट्रीक्स पार्टनर्स इंडिया, आणि Y Combinator यांचा पाठिंबा आहे.

भारतातील अब्जाधीशांची संध्या गेल्या १२ वर्षांत मोठ्या प्रमाणात कमीजास्त झाली आहे. २०२२ मध्ये यामध्ये मोठी वाढ झाली होती. या वर्षी अब्जाधीशांची संख्या २४९ पर्यंत वाढली होती, अशी माहिती हुरूनने दिली आहे. मात्र २०२३ मध्ये ही संख्या घटून १८७ झाली होती. २०२४ मध्ये अब्जाधीशांची संख्या २७१ आणि २०२५ मध्ये २८४ अब्जाधीश इतकी नोंदवली गेली आहे.

“भारतीय अब्जाधीशांच्या एकत्रीत संपत्तीने ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे, जो समृद्धीच्या नवीन युगाचा संकेत आहे,” असे हुरुन इंडियाचे संस्थापक आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद म्हणाले आहेत. “विशेष म्हणजे या अब्जाधीशांपैकी ६२ टक्के अब्जाधीशांच्या संपतीत वाढ दिसून आली, जे देशातील पॉझिटीव्ह इकोनॉमीक ट्रेंड अधोरेखित करते,” असेही ते म्हणाले आहेत.