पीटीआय, कलबुर्गी (कर्नाटक)
केंद्र सरकारने कर्नाटकसाठी ३,४९९ कोटी रुपयांचा दुष्काळ निधी मंजूर केला आहे आणि त्यापैकी केवळ ३,४५४ कोटी रुपये जारी केले आहेत असे राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. निधीची उर्वरित रक्कमही शक्य तितक्या लवकर द्यावी अशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
केंद्राने मंजूर केलेली रक्कम राज्य सरकारच्या मागणीच्या एक-चतुर्थाशही नसल्याचे सिद्धरामय्या म्हणाले. त्याचबरोबर केंद्र सरकराला इशारा दिल्याबद्दल आणि राज्य सरकारला थोडी दुष्काळ मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. कर्नाटकच्या जनतेचा अधिकार मिळवण्यासाठी आपण फेब्रुवारी महिन्यात दिल्लीमध्ये निदर्शने केली होती याचीही आठवण त्यांनी करून दिली.
हेही वाचा >>>“पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतरत्न द्या आणि हिमालयात..”, मार्कंडेय काटजूंचं वक्तव्य
केंद्र सरकारने कर्नाटकबद्दल चिंता वाटून दुष्काळ मदत निधी दिला नसून राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांना पैसे द्यावे लागले अशी टीका सिद्धरामय्या यांनी केली. यामध्ये भाजप नेते किंवा केंद्र सरकारने कोणतीही भूमिका बजावली नाही असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘‘आमच्या याचिकेवर सुनावणी घेणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाची खात्री पटली होती की, केंद्र सरकार राजकीय कारणांमुळे कर्नाटकवर अन्याय करत आहे.’’ कर्नाटकला आता मदत निधी दिला नाही तर राज्यातील जनता त्यांना निवडणूक प्रचारासाठी येऊ देणार नाही अशी भीती भाजपला वाटली असा दावाही सिद्धरामय्या यांनी केला.
राज्यातील भाजपचे नेते ही लहानशी मदत त्यांचे यश म्हणून दाखवणार असतील तर, राज्यातील जनतेने त्यांना जशास तसे उत्तर द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो. – सिद्धरामय्या, मुख्यमंत्री, कर्नाटक