केंद्रीय मंत्रिमंडळातील ७७ पैकी ३५ मंत्र्यांनी अद्याप आपली मालमत्ता जाहीर केलेली नाही. केंद्रीय मंत्र्यांनी ३१ ऑगस्टपूर्वी आपली मालमत्ता पंतप्रधानांपुढे जाहीर करावी, अशी मंत्र्यांसाठी आचारसंहिता असतानाही जवळपास निम्म्या मंत्र्यांनी त्याला वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत. 
कॅबिनेटमधील ३२ पैकी १८ मंत्र्यांनी, स्वतंत्र प्रभार असलेल्या १२ पैकी ७ राज्यमंत्र्यांनी आणि ३३ पैकी १७ राज्यमंत्र्यांनी अद्याप आपली मालमत्ता जाहीर केलेली नाही.
मालमत्ता जाहीर न केलेल्या प्रमुख मंत्र्यांमध्ये गुलाम नबी आझाद, अजित सिंग, कपिल सिब्बल, श्रीप्रकाश जयस्वाल, एम. एम. पल्लम राजू, हरिश रावत या कॅबिनेट मंत्र्यांचा तर शशी थरूर, आर. पी. एन. सिंग, डी. पुरंदेश्वरी, प्रदीप जैन या राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
ए. के. ऍंटनी, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, पी. चिदंबरम, एम. वीरप्पा मोईली, मल्लिकार्जुन खर्गे, ऑस्कर फर्नांडिस, सलमान खुर्शिद या मंत्र्यांनी आपली मालमत्ता जाहीर केली आहे.