काँग्रेसमधील बंडखोर ‘जी-२३’ गटाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर घणाघाती टीका करत पक्षाचा राजीनामा दिला. आझाद यांच्या राजीनाम्यानंतर पक्षाला गळती लागल्याचे दिसून येत आहे. आझाद यांच्यासह जम्मू-काश्मीरमधील अनेक काँग्रेस नेत्यांनी आणि आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर आता पुन्हा काँग्रेस मोठा धक्का बसला आहे. गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ भारतीय राष्ट्रीय छात्र संघाच्या (NSUI) ३६ विद्यार्थी नेत्यांनी राजीनामा दिला आहे. जम्मू-कश्मीर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिरुद्ध रैना तसेच प्रदेश सरचिटणीस माणिक शर्मा यांनीही राजीनामा दिला आहे.
राहुल गांधींवर निशाणा साधत आझादांचा राजीनामा
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना चार पानी पत्र लिहीत आझादांनी राजीनामा दिला होता. या पत्राद्वारे त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी पक्षासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. सर्व काही एका पत्रामध्ये लिहून राजीनामा देण्याचा माझा उद्देश होता. मात्र, राजीनामा दिल्यानंतर पक्षाने माझ्यावर खोटे आरोप करुन मला भडकवण्याचा प्रयत्न केला,”राहुल गांधी पक्षासाठी नव्हे तर केवळ फोटो आणि धरणं आंदोलनासाठी योग्य आहेत, राहुल गांधींचे संघटनेच्या पुनर्बांधणीवर लक्ष नाही. ते फोटो आणि धरणं आंदोलन, सार्वजनिक रॅलींसाठी योग्य आहेत. प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांला माहिती आहे की राहुल गांधींचे सुरक्षा रक्षक अथवा पीए पक्षातील निर्णय घेतात,” असा निशाणा आझादांनी राहुल गांधींवर साधला होता.
गुलाम नबी आझाद स्वतःचा पक्ष स्थापन करणार
दरम्यान, काँग्रेसला सोडचिट्ठी दिल्यानंतर गुलाम नबी आझाद नवा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. येत्या १४ दिवसांमध्ये पक्षाच्या स्थापनेची घोषणा होईल, अशी माहिती जम्मू काश्मीरचे माजी मंत्री ताज मोहीउद्दीन यांनी दिली आहे. मोहीउद्दीन यांनी सुद्धा काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वातील नवा पक्ष ‘जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स’(JKNC) आणि ‘द पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टी’ (PDP) यांच्या पक्षासह युती करणार असल्याचे संकेत मोहीउद्दीन यांनी दिले आहेत.