फ्रान्सकडून १२६ राफेल विमाने खरेदी करण्याचा यूपीएचा प्रस्ताव आर्थिकदृष्टय़ा अयोग्य होता व एवढय़ा विमानांची काही गरजही नव्हती त्यामुळे एनडीए सरकारने आता ३६ विमाने खरेदी करण्याचे ठरवले आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरयांनी सांगितले.
संरक्षण मंत्री ए.के.अँटनी यांनी या विमानांसाठी जी निविदा प्रक्रिया केली त्याबाबत प्रश्न उपस्थित करताना र्पीकर यांनी सांगितले की, अँटनी यांनी राफेल करार ज्या पद्धतीने केला होता त्यानुसार तो कधीच पूर्णत्वास गेला नसता.
अर्थमंत्रालय व संरक्षण सामुग्री खरेदी मंडळाला अंधारात ठेवून हा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतल्याच्या काँग्रेसच्या टीकेवर त्यांनी सांगितले की, या करारावर अजून स्वाक्षऱ्या झालेल्या नाहीत, पण यात कुणालाही अंधारात ठेवण्यात आलेले नाही. करारावर जी समिती नेमली आहे ती २-३ महिन्यांत आपले काम पूर्ण करील. यूपीए सरकारने १२६ राफेल विमाने २० अब्ज डॉलर्सना खरेदी करण्याचा करार केला होता तो मोडीत काढला आहे. दसॉल्टची निविदा कमी दराची आहे हे समजल्यानंतर तीन वर्षांनी हा करार केला होता. मोदी यांनी आताच्या फ्रान्स दौऱ्यात ३६ जेट विमाने खरेदी करण्यास तयारी दर्शवली आहे व भारतीय हवाई दलांची तातडीची गरज म्हणून हा निर्णय घेण्यात आला. यूपीएचा १२६ विमानांचा करार महागडा होता त्यासाठी १०-११ वर्षांत १.३ लाख कोटी रुपये खर्च झाला असता.

Story img Loader