पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा १००वा भाग ऐकण्यासाठी अनुपस्थित राहिल्याबद्दल चंदीगढमधील पीजीआय नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या ३६ विद्यार्थिनींवर कारवाई करण्यात आली आहे. या सर्व विद्यार्थिनींना आठवडाभर वसतिगृहाबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती आहे.
‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, ३० एप्रिल रोजी चंदीगढमधील पीजीआयच्या इन्स्टिट्यूटच्या एलटी-१ सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा १००व्या भाग ऐकण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, अशी सुचना पीजीआयच्या संचालकांकडून करण्यात आली होती. सर्व विद्यार्थिनींना ३० एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता एलटी-1 सभागृहात उपस्थित राहण्याचे आदेश त्यांनी दिले होते. मात्र, प्रथम वर्षाला शिकणाऱ्या २८ आणि तृतीय वर्षाला शिकणाऱ्या आठ अशा एकूण ३६ विद्यार्थिनी या कार्यक्रमाला अनुपस्थित होत्या. त्यामुळे त्यांना एका आठवड्यासाठी वसतीगृहात स्थानबद्ध करण्याची शिक्षा सुनावण्यात आली.
हेही वाचा – महिला डॉक्टरची हत्या; केरळमधील वैद्यकीय कर्मचारी आक्रमक
यासंदर्भात बोलताना संस्थेच्या प्राचार्या डॉ. सुखपाल कौर म्हणाल्या, “आम्ही विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतो. या कार्यक्रमांना उपस्थित राहणं विद्यार्थ्यांना अनिवार्य असतं. ३० एप्रिल रोजी एलटी-१ सभागृहात झालेला कार्यक्रमही त्यापैकीच एक होता. त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित न राहल्याने विद्यार्थिनींवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. केवळ ‘मन की बात’ कार्यक्रमाला उपस्थित न राहल्याने ही कारवाई करण्यात आली, असा अर्थ कोणीही काढू नये”
हेही वाचा – झिंगाट यूपी! उत्तर प्रदेशात दररोज ११५ कोटींची दारू होतेय फस्त
दरम्यान, यावरून काँग्रेसने भाजपा लक्ष्य केलं असून देशात एकप्रकारे हुकूमशाही सुरू आहे, अशी टीका युवक काँग्रेसचे राज्य प्रमुख मनोज लुबाना यांनी केली. तसेच केंद्र सरकारच्या दाबावाखाली येऊन हा निर्णय घेण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला.