दिल्लीत राहणाऱ्या 36 वर्षीय तरुणाने घसा साफ करण्याच्या नादात चक्क टूथब्रश गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एम्समधील डॉक्टरांनी एन्डोस्कोपीद्वारे टूथब्रश बाहेर काढले असून सध्या त्या तरुणाची प्रकृती स्थिर आहे.
दिल्लीतील सीमापूरी येथे राहणारा अबिद 8 डिसेंबर रोजी सकाळी ब्रश केल्यानंतर घसा साफ करत होता. यादरम्यान त्याने चक्क टूथब्रश गिळला. अबिदने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. दुसऱ्या दिवशी अबिदला पोटदुखीचा त्रास सुरु झाला. त्याला तातडीने जवळील जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेही अबिदने डॉक्टरांना नेमके काय झाले हे सांगितले नाही. डॉक्टरांनी त्याला पेन किलर देत पोटदुखीचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अबिदवर औषधांचा परिणाम होत नव्हता. डॉक्टरांनी छातीचा एक्स रे तसेच सीटी स्कॅन करुन पाहिले. पण यातून काहीच स्पष्ट होत नव्हते. पोटाच्या सीटी स्कॅनमध्ये पोटात काही तरी अडकल्याचे उघड झाले. शेवटी डॉक्टरांनी अबिदला याबाबत विचारणा केली असता त्याने ब्रश गिळल्याचे मान्य केले.
जीटीबी रुग्णालयात एन्डोस्कोपी करण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. मग अबिदला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पुन्हा एकदा सीटी स्कॅन करुन ब्रश पोटात नेमके कुठे अडकले आहे, याचा अंदाज घेतला. यानंतर एन्डोस्कोपीद्वारे त्याच्या पोटातून ब्रश बाहेर काढण्यात आले. या ब्रशची लांबी 12 सेंटीमीटर इतकी होती. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.