इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आयआयटी हे देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या यादीत सर्वोत्तम मानले जाते. मात्र, याच महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बरोजगार राहत असल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आलं आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे.
आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी धीरज सिंह यांनी माहितीच्या अधिकाराखाली मागितलेल्या माहितीनुसार, यावर्षी सर्व २३ आयआयटी कॅम्पसमधील सुमारे ८ हजार विद्यार्थ्यांना अद्यापही नोकरी मिळाली नसल्याचे पुढे आलं आहे, म्हणजेच ३८ टक्के विद्यार्थी अद्यापही बेरोजगार आहेत. यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
हेही वाचा – IIT, MIT मधून पदवी ते पीएचडी शिक्षण पूर्ण करणाऱ्या आयआयटी मद्रासच्या पहिल्या महिला डायरेक्टर कोण? पाहा
माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, २०२३-२०२४ या वर्षात २१ हजार ५०० विद्यार्थ्यांनी कॅम्पसमधून नोकरीसाठी अर्ज केला होता. त्यापैकी केवळ १३ हजार ४१० विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळण्यात यश आलं आहे. उर्वरित जवळपास ३८ टक्के विद्यार्थी अद्यापही नोकरीच्या शोधात आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा आकडा दुप्पटीने वाढला आहे. गेल्या वर्षी बेरोजगारांची संख्या १९ टक्के होती. म्हणजेचे ३४०० विद्यार्थी बरोजगार होते.
देशातील एकूण २३ आआयटी कॅम्पसपैकी जुन्या ९ आयआयटी कॅम्पसमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. यावर्षी या ९कॅम्पसमधून एकूण १६ हजार ४०० विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी अर्ज केला होता. मात्र, केवळ ६३ टक्के विद्यार्थ्यांनाच केवळ नोकरी मिळू शकली आहे. तर ३७ विद्यार्थी बेरोजगार आहेत. तर नव्याने स्थापन झालेल्या १४ आयआयटीमधून ४० टक्के म्हणजे ५१०० पैकी २०४० विद्यार्थी बेजोजगार असल्याचे पुढे आलं आहे.
हेही वाचा – ‘आयटी’ कंपन्यांच्या मनुष्यबळात घट; देशातील आघाडीच्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रोचा समावेश
संदर्भात बोलताना धीरज सिंग म्हणाले, गेल्या वर्षी आयआयटी खडकपूरमधून पास झालेले ३३ टक्के विद्यार्थी अद्यापही नोकरीच्या शोधात आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी तणावात आहेत. याच निराशेतून एकूण सहा विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्विकारला आहे. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.