चार जणांच्या टोळक्यानं एका ३२ वर्षीय रिक्षाचालकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणांनी मृत रिक्षाचालकाला दारू पार्टीसाठी बोलावलं होतं. सर्वांनी एकत्र येऊन दारू प्यायल्यानंतर आरोपींनी दारुची बाटली डोक्यात घालून रिक्षाचालकाची हत्या केली आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी रक्तबंबाळ झालेल्या मृतदेहासोबत सेल्फी काढले आहे. संबंधित सेल्फी फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संबंधित घटना चेन्नईजवळील न्यू मनाली शहरात घडली आहे. चारही आरोपींनी पोलिसांनी अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. रविचंद्रन असं हत्या झालेल्या ३२ वर्षीय रिक्षाचालकाचं नाव आहे. तर मधन कुमार (३१), धनुष (१९), जयप्रकाश (१८) आणि भारत (१९) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. आरोपींनी पूर्ववैमनस्यातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रिक्षाचालक रविचंद्रन याचा काही दिवसांपूर्वी आरोपी मधन याच्याशी वाद झाला होता. याच वादातून आरोपी मधन याने रविचंद्रनच्या हत्येचा कट रचला. त्यानं आपल्या अन्य तीन मित्रांच्या मदतीनं रविचंद्रनची हत्या केली. घटनेच्या दिवशी बुधवारी रात्री आरोपी मधनने रविचंद्रन याला मद्यपार्टी करण्यासाठी न्यू मनाली शहरातील एका खेळाच्या मैदानात बोलावलं होतं. आपल्या दोघात सुरू असलेला वाद संपवू, असंही मधनने रविचंद्रनला समजावलं होतं. त्यानुसार मृत रविचंद्रन संबंधित ठिकाणी गेला होता.

दरम्यान, रविचंद्रनची बायको किर्तना त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. पण त्याचा फोन बंद लागत होता. त्यामुळे घाबरलेल्या किर्तना यांनी आपल्या काही नातेवाईकांसोबत पतीला शोधायला सुरुवात केली. संबंधित सर्वजण वेट्री नगर परिसरातील मैदानात पोहोचले असता त्यांना रविचंद्रनचा मृतदेह त्याठिकाणी दिसला. यावेळी चारही आरोपी मृतदेहासोबत सेल्फी फोटो काढत होते. नातेवाईक घटनास्थळी आल्यानंतर आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आसपास पडलेल्या पुराव्यानुसार आरोपींनी दारुची बाटली डोक्यात घालून ही हत्या केली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

संबंधित हत्या आम्हीच केलीये, याचा पुरावा मित्रांना दाखवण्यासाठी आरोपींनी मृतदेहासोबत सेल्फी काढली होती. पण संबंधित सेल्फी व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. संबंधित सेल्फीमुळेच आरोपींची ओळख पटल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.