काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या केरळमधील वायनाड येथील कार्यालयाची जूनमध्ये तोडफोड करण्यात आली होती. एसएफआयच्या काही कार्यकर्त्यांनी तोडफोड करून गोंधळ घातल्याचे सांगण्यात आलं होतं. संबंधित घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. मात्र, त्याप्रकरणी आता पोलिसांनी काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यामध्ये राहुल गांधींचा एक पीएही असल्याचं बोललं जात आहे.

खरं तर, काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरणाबाबत एक मोठा निर्णय दिला होता. त्यानुसार, संरक्षित जंगले किंवा वन्यजीव अभयारण्यांभोवतीचा एक किलोमीटरचा संपूर्ण परिसर हा पर्यावरण-संवेदनशील क्षेत्र (ESZ) म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण या नियमांची काटेकोर अंमलबजावणी झाली, तर जंगल परिसरात राहणाऱ्या लोकांचे काय होणार? ते कुठे जाणार? असा वाद केरळात सुरू झाला होता. याच कारणातून एसएफआयच्या काही कार्यकर्त्यांनी २४ जून रोजी राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचे आरोप करण्यात आले होते.

पण काँग्रेसकडून करण्यात आलेले हे आरोप पोलिसांनी फेटाळून लावले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तोडफोड एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी केली नसून काही काँग्रेस कार्यकर्त्यांनीच केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यामध्ये राहुल गांधी यांच्या पीएचाही समावेश आहे.

हेही वाचा- गडकरींना स्थान देण्यात न आलेल्या संसदीय मंडळाची घोषणा केल्यानंतर स्वामींचा भाजपाला घरचा आहेर; म्हणाले “आता सगळं मोदीच…”

जेव्हा राहुल गांधी यांच्या कार्यालयावर हल्ला झाला, तेव्हा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये काही आंदोलक कार्यालयाच्या खिडकीतून आत जाण्याचा प्रयत्न करत होते. संबंधित आंदोलकांनी कार्यालयात शिरून महात्मा गांधींची फोटो फ्रेमही तोडल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र, तपासानंतर या घटनेला वेगळं वळण लागलं आहे.

हेही वाचा- ‘राहुल गांधी यांच्या कार्यालयावरील हल्ला विजयन यांच्या मूक संमतीने’; काँग्रेसचा माकपवर आरोप

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी २ जुलै रोजी विधानसभेत सांगितलं की, पोलिसांनी सायंकाळी चारच्या सुमारास राहुल गांधींच्या कार्यालयात शिरलेल्या सर्व SFI कार्यकर्त्यांना बाहेर काढलं होतं. त्यावेळी पोलिसांनी तोडफोड झालेल्या ठिकाणांचे काही फोटो काढले होते. त्यामध्ये महात्मा गांधींचा फोटो भिंतीवर व्यवस्थित असल्याचं दिसत होतं. एसएफआय कार्यकर्त्यांना बाहेर काढल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते कार्यालयात गेले होते. सायंकाळी पुन्हा पोलिसांनी तोडफोड झालेल्या घटनेचे फोटो काढले, तेव्हा महात्मा गांधीच्या फोटोची तोडफोड झाल्याचं आणि ते फुटलेल्या अवस्थेत जमिनीवर पडल्याचं आढळलं, असा दावा विजयन यांनी केला आहे. तसेच याबाबतचा अहवाल पोलिसांना देण्यात आला आहे.

Story img Loader