टोरांटो : कॅनडामध्ये एक पिक अप ट्रक गर्दीत घुसवून चार जणांच्या मुस्लिम कुटुंबाला ठार मारण्यात आले. त्याच कुटुंबातील एक जण गंभीर जखमी झाला आहे. मुस्लिम असल्याने ठरवून हा हल्ला करण्यात आला असे कॅनडाच्या पोलिसांचे म्हणणे आहे.

दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे की, जे मारले गेले ते पाकिस्तानी वंशाचे होते हा हल्ला म्हणजे इस्लामभयाचा भाग असून दहशतवादी हल्लाच आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या हल्ल्याप्रकरणी एका तरुणास अटक करण्यात आली असून रविवारी रात्री ‘ओंटारिओतील  सिटी ऑफ लंडन’ भागात रात्रीच्या वेळी हा हल्ला झाला. त्यात हल्लेखोराला एका मॉलजवळ अटक करण्यात आली. हल्लेखोराने पिक अप ट्रक या कुटुंबाच्या अंगावर घातला.

मुस्लिमांविरोधात सामूहिक हिंसाचार घडवण्याच्या प्रकाराचा हा एक भाग होता असे महापौर एड होल्डर यांनी म्हटले आहे. द्वेषमूलकतेतून हा हल्ला करण्यात आला.

मृतांमध्ये सलमान अफजल  (वय ४६), त्याची पत्नी मदिना (वय ४४), त्यांची कन्या युम्ना (वय १५), आजी (वय ७४) यांचा समावेश आहे. एका मुलाला रुग्णालयात दाखल केले असून त्याचे नाव फैयाझ असे आहे. मुस्लिम, कॅनडेयिन व पाकिस्तानी अशी बहुविध ओळख असलेले हे आदर्श कुटुंब होते.

ते त्यांच्या क्षेत्रात चांगले काम करीत होते. मुलेही शाळेत अग्रस्थानी होती. वडील हे सायकोथेरपिस्ट होते. त्यांना क्रिकेटची आवड होती. पत्नी वेस्टर्न युनिव्हर्सिटी लंडन या संस्थेत नागरी अभियांत्रिकीत पीएचडी झालेली होती. मुलगी नववीला होती तर आजी त्या कुटुंबाचा मानसिक आधार होती. इस्लामभयापासून मुस्लिमांना वाचवण्याची गरज आहे, असे त्यांच्या कुटुंबातील उर्वरित सदस्यांनी म्हटले आहे.

तरुण व्यक्तीने केलेले हे कृत्य एखाद्या गटाच्या विचारसरणीनुसार केलेले असून तो दहशतवादाचा भाग आहे. त्याविरोधात ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. असे त्यांनी सांगितले.

हल्लेखोर द्वेषमूलक गटाचा सदस्य?

हल्लेखोर नॅथॅनिएल व्हेल्टमन (वय २०) याला अटक करण्यात आली  आहे. पोलिसांनी सांगितले की, व्हेल्टमन हा ‘लंडन’ चा रहिवासी असून तो ज्यांना मारले त्यांना ओळखत नव्हता. हल्लेखोर हा एखाद्या द्वेषमूलक गटाचा सदस्य होता असे अजून निष्पन्न झालेले नाही, असे गुप्तचर गटाचे अधीक्षक पॉल वेट यांनी म्हटले आहे  पोलीस प्रमुख स्टीफन विल्यम्स यांनी सांगितले की, मुस्लिम असल्यानेच त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.

Story img Loader