इस्लामिक स्टेटच्या (इसिस) दहशतवाद्यांविरोधात भारतीय संरक्षण यंत्रणांना मोठं यश मिळालं आहे. गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अहमदाबाद विमानतळावरून इसिसच्या चार दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं आहे. एटीएसने अद्याप या चौघांची माहिती जाहीर केलेली नाही. मात्र, या कारवाईबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे चौघेही श्रीलंकेचे नागरिक आहेत. गुजरात एटीएस याप्रकरणाची माहिती देण्यासाठी लवकरच एक पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. हे चार दहशतवादी अहमदाबादला येत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून एटीएसला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीएस आणि इतर पोलीस कर्मचारी अहमदाबाद विमानतळावरच दबा धरून बसले होते. दहशतवादी विमानतळावर दाखल होताच एटीएसने त्यांना बेड्या ठोकल्या.
एटीएसने या दहशतवाद्यांना कुठे नेलंय, दहशतवाद्यांचं अहमदाबादला येण्याचं उद्दीष्ट काय होतं? याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या दहशतवाद्यांकडून मिळालेल्या तिकीटांवरून सूत्रांनी सांगितलं की ते चेन्नईवरून अहमदाबादला आले होते. चारही दहशतवादी आधी कोलंबोवरून चेन्नई आणि मग चेन्नईवरून अहमदाबादला आले होते. त्यांचे हँडलर भारतात त्यांना मार्गदर्शन करत होते. त्यामुळे एटीएस आता या हँडलर्सचा शोध घेत आहे.
हे दहशतवादी चेन्नईमध्ये, अहमदाबादमध्ये ज्या-ज्या लोकांना भेटले होते त्यांच्यापासून आणि त्यांना भारतात मार्ग दाखवणाऱ्या हँडलर्सपासून देशाला मोठा धोका आहे. त्यामुळे गुजरात एटीएससह देशातील इतर संरक्षण यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हे दहशतवादी अहमदाबादमध्ये त्यांच्या हँडलरच्या संदेशाची वाट पाहत होते. त्याआधीच एटीएसने त्यांच्या मुसक्या आवळल्या. या दहशतवाद्यांना पकडलं असलं तरी ऐन निवडणुकीत चार दहशतवादी भारतात घुसले होते, या बातमीने संरक्षण आणि गुप्तचर यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत.
हे ही वाचा >> Ebrahim Raisi Helicopter Crash: इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, देशावर शोककळा
इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIS) ही दहशतवादी संघटना गेल्या काही वर्षांपासून भारतात हातपाय पसरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि संरक्षण यंत्रणांनी त्यांना अद्याप यशस्वी होऊ दिलेलं नाही. यावर्षी मार्च महिन्यात संरक्षण यंत्रणांनी आसाममध्ये इसिसच्या एका कमांडरला बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्याबरोबर आसाममधील त्याच्या हँडलरलाही ताब्यात घेतलं होतं. इसिसचा हा कमांडर बांगलादेश-भारत सीमा ओलांडून भारतात घुसला होता.