ढाका : बांगलादेशात दुर्गापूजा उत्सवात अज्ञात धर्माधांनी अनेक हिंदू मंदिरांवर हल्ले करून त्यांचा विध्वंस केला. या वेळच्या दंगलींमध्ये चार जण ठार व अनेक जण जखमी झाल्यामुळे २२ जिल्ह्य़ांमध्ये निमलष्करी दले तैनात करणे सरकारला भाग पडले, असे माध्यमांच्या वृत्तांमध्ये म्हटले आहे.
हिंसाचार पसरण्यापासून थांबवण्यासाठी देशाच्या २२ जिल्ह्य़ांमध्ये बॉर्डर गार्ड्स बांगलादेश (बीजीबी) ची दले तैनात करण्यात आल्याचे गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. गुन्हे प्रतिबंधक रॅपिड अॅक्शन बटालियन (आरएबी) आणि सशस्त्र पोलिसांनाही हिंसाचार रोखण्यासाठी बीजीबीसोबत सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.
माध्यमांच्या वृत्तांनुसार, चांदपूरच्या हाजीगंज उपजिल्ह्य़ात धर्माध व पोलीस यांच्यात बुधवारी झालेल्या संघर्षांत किमान ४ जण ठार, तर अनेक जण जखमी झाले. हाजीगंज येथे मेळावे आयोजित करण्यावर अधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाक्यापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावरील कुमिला येथे दुर्गापूजा मंडपात ईश्वरनिंदेची कथित घटना घडल्याचे पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. तथापि, धर्माधांनी कुमिलातील काही भाग, लगतचे हाजीगंज व हटिया व बंसखली येथील मंदिरांवर हल्ले केल्यानंतर हिंसाचार उफाळला. धार्मिक तणाव भडकावण्यासाठी समाजमाध्यमांचा मोठय़ा प्रमाणावर वापर करणयात आला.
हा हिंसाचार म्हणजे दुर्गापूजा उत्सव उधळून लावण्याचे कारस्थान असल्याचा आरोप करतानाच; धर्माधावर कारवाई करावी आणि हिंदू मंदिरांचे संरक्षण करावे, अशी मागणी हिंदू नेत्यांनी केली.
दुर्गापूजा थांबवण्यासाठी निदर्शने करून एका विशिष्ट गटाने पूजा मंडपात ईश्वरनिंदा केल्याचे कुमिला जिल्हा पूजा समितीच्या सचिवांनी सांगितले. लोकांनी कायदा आपल्या हातात घेऊ नये असे आवाहन करणारी तातडीची सूचना धार्मिक व्यवहार मंत्रालयाने जारी केली आणि धार्मिक ऐक्य व शांतता कायम राखण्याचेही आवाहन केले. बांगलादेशातील धर्माधांनी ढाक्यापासून १०० किलोमीटर अंतरावरील कुमिलातील काही भाग, लगतचे हाजीगंज व हटिया व बंसखली येथील मंदिरांवर हल्ले केल्यानंतर हिंसाचार उफाळला.