छत्तीसगडच्या राजनंदगाव जिल्ह्य़ात झालेल्या चकमकीत दोन महिलांसह चार नक्षलवादी ठार झाले तर एक पोलीस अधिकारी शहीद झाला. ठार झालेल्या सर्व नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी इनाम जाहीर करण्यात आले होते, असे शनिवारी पोलिसांनी सांगितले.
छत्तीसगड-महाराष्ट्राच्या सीमेवर सक्रिय असलेल्या बडय़ा नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले हे दलाचे मोठे यश असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारधौनी गावात शुक्रवारी रात्री ही चकमक उडाली, असे पोलीस महानिरीक्षक (दुर्ग परिमंडळ) विवेकानंद सिन्हा यांनी सांगितले.
पारधौनी गावात सात-आठ नक्षलवादी आले असून त्यांनी तेथे वास्तव्य केल्याची खबर मिळाली. त्यानंतर २८ जणांच्या पथकाने या परिसरात कारवाई सुरू करून वेढा घातला तेव्हा नक्षलवाद्यांनी बेछूट गोळीबार केला, त्या पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. जवळपास २० मिनिटे चकमक सुरू होती.
चकमक थांबल्यानंतर घटनास्थळी शोध घेतला असता दोन महिलांसह चार नक्षलवाद्यांचे गणवेशातील मृतदेह मिळाले.