Gujarat highway Accident : गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील थरड राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रस्त्याच्या कडेला काम करत असलेल्या कामगारांवर वाळूने भरलेले डंपर उलटल्याचा भयंकर प्रकार घडला. या अपघातात तीन महिला आणि एका मुलासह चार जणांचा मृत्यू झाला आहे.
रस्त्याच्या कडेला बांधकाम सुरू होते तेव्हा ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचा चालक एका अरुंद वळणावरून ट्रक घेऊन जात होता. यावेळी ट्रक अचानक उलटला. या घटनेनंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. अखेर पीडितांचे मृतदेह जेसीबीच्या साहाय्याने वाळूच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले.
“सर्व मृत्यू झालेले कामगार हे दाहोद जिल्ह्यातील होते आणि ते कामासाठी या भागात आले होते,” असे एका पोलीस अधिकार्याने सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
वाळूने भरलेले डंपरने चालक अरूंद रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळी तो उलटला आणि रस्त्याचे काम करत असलेल्या कामगारांवर कोसळला, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक एस.एम. वरोटरिया यांनी दिली. या घटनेनंतर क्रेन आणि बुलडोझरच्या मदतीने ट्रकखाली अडकलेल्या महिला आणि मुलाला बाहेर काढण्यासाठी सुमारे दोन तास लागले, त्यानंतर चौघांनाही सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले,
थरड येथील सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी जयदीप त्रिवेदी यांनी सांगितलं की, चार जणांना मृत अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते.
मृतांची ओळख पटली
त्यानंतर या घटनेबद्दल पोलिसांना कळवण्यात आले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख पटली असून मृतांमध्ये रेणुकाबेन गणवा (२४), सोनलबेन निनामा (२२), इलाबेन भाभोर (४०) आणि रुद्र (२) यांचा समावेश आहे.