एपी, नैरोबी
केनियामध्ये सोमवारी पहाटे धरण फुटून किमान ४० जण ठार झाले, तसेच अन्य बरेच जण जखमी झाले अशी माहिती पोलिसांनी दिली. पश्चिम केनियाच्या ‘ग्रेट रिफ्ट व्हॅली’ प्रदेशातील माई महिउ क्षेत्रात स्थित असलेले ‘ओल्ड किजाबे डॅम’ फुटल्यानंतर पाणी प्रचंड वेगाने घरांमध्ये घुसले आणि एक महत्त्वाचा रस्ता वाहून गेला. ग्रेट रिफ्ट व्हॅली प्रदेशाच अचानक पूर येण्याच्या घटना घडत असतात.
किजाब धरण फुटून पाणी खालील बाजूला वाहिले. त्यासोबत मोठ्या प्रमाणात चिखल, दगड वाहून गेले आणि झाडे उखली गेली असे पोलिसांनी सांगितले. मोठ्या प्रदेशात पाणी भरले असून सर्वत्र पाणी पसरल्याने केनियाच्या सर्वात वर्दळीच्या महामार्गांपैकी एक असलेल्या एका रस्त्यावर वाहने चिखलात रुतली. यामध्ये जखमी झालेल्यांवर उपचार केले जात आहेत. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सर्व सार्वजनिक आणि खासगी धरणे आणि जलसाठ्यांच्या तपासणीचे आदेश गृह मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.
हेही वाचा >>>राजीनामा दिल्यानंतर दिल्ली काँग्रेसचे माजी अध्यक्ष म्हणाले, “पक्षातील काही समस्या…”
केनियामध्ये गेल्या महिन्यापासून सातत्याने मुसळधार पाऊस पडत असून आतापर्यंत वेगवेगळ्या वेळी आलेल्या पुरांमध्ये जवळपास १०० व्यक्ती मरण पावल्या आहेत. तेथील हवामान विभागाने आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर, वाहतूक विभागाने प्रभावित क्षेत्रातील महामार्गांवर वाहतूक कोंडीचाही इशारा दिला आहे.