बंगळुरूहून हैदराबादकडे जात असलेल्या व्होल्वो बसला पालमजवळ झालेल्या अपघातात ४५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. बसवरील चालकाचे नियंत्रण सुटून दुभाजकावर आदळली व इंधनाच्या टाकीने पेट घेतल्याने ही भीषण दुर्घटना घडली. या अपघातात बसचालक व त्याचा सहाय्यक यांच्यासह पाच प्रवासी बचावले आहेत.
जब्बार ट्रॅव्हल्सची व्होल्वो बस मंगळवारी रात्री ११च्या सुमारास बंगळुरूहून निघाली. बंगळुरू-हैदराबाद मार्गावरील पालम गावानजीक येताच चालकाचा बसवरील ताबा सुटून ती दुभाजकावर आदळली. दुभाजकावर आदळल्याने गाडीची इंधनाची टाकी फुटली. क्षणार्धात बसला आगीच्या ज्वाळांनी वेढले. पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. अवघ्या १५ मिनिटांत बस पूर्णपणे पेटली. त्यात ४५ जणांचा होरपळून मृत्यू झाला.
संकटकालीन दरवाजा तोडला
अपघातामध्ये प्रसंगावधान राखून संकटकालीन दरवाजा तोडल्याने वाचल्याचे एका प्रवाशाने सांगितले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जणांनी खिडकीची काच फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश न आल्याने आपत्कालीन दरवाजा तोडून बाहेर उडी मारून जीव वाचवला असे एका प्रवाशाने सांगितले, तर शेजारून जाणाऱ्या वाहनाच्या चालकाने क्लीनरला बाहेर ओढले त्यामुळे तो बचावला. या क्लीनरवर हैदराबादमध्ये उपचार सुरू आहेत.
वाहनात दोष नसल्याचा दावा
बसची मालकी असलेल्या जब्बार ट्रॅव्हल्सने वाहनात कोणताही दोष नसल्याचा दावा केला आहे. बसची व्यवस्थित देखभाल ठेवली गेल्याचे जमिल जब्बार यांनी स्पष्ट केले. ६ ऑक्टोबर २०१४ पर्यंतची बसची वैधता प्रमाणपत्र तसेच विमा आणि परवाना कागदपत्रे असल्याचे कर्नाटकचे वाहतूक आयुक्त अमरनारायणा यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 40 killed as hyderabad bound private bus catches fire
Show comments