गडचिरोली : छत्तीसगडच्या दंतेवाडा-नारायणपूर सीमावर्ती भागातील दक्षिण अबूझमाडमध्ये शुक्रवारी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत ४० नक्षलवादी ठार झाले. रात्री उशिरापर्यंत ही चकमक सुरू होती. घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठाही हस्तगत करण्यात आला आहे. अलिकडच्या काळातील ही सर्वांत मोठी कारवाई असून यामुळे माओवादी चळवळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
गडचिरोलीपासून सुमारे अडीचशे किलोमीटर दंतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात दक्षिण अबूझमाडमध्ये काही नक्षलवादी दबा धरून बसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार दोन्ही जिल्ह्यांच्या सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तपणे शोधमोहीम हाती घेतली होती. त्यावेळी नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर अनेक तास चकमक झडली. आतापर्यंत ४० नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले असून एके-४७, एसएलआरसह अन्य शस्त्र व साहित्याचा मोठा साठा आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सर्व जवान सुरक्षित असल्याची माहिती आहे. या वर्षभरात छत्तीसगडमध्ये तब्बल १९० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून ६६९ जणांना अटक करण्यात आली आहे. ६५६ माओवाद्यांनी या काळात आत्मसमर्पण केले आहे.
हेही वाचा >>> Ashwini Vaishnaw : मोदी सरकार रेल्वेचं खासगीकरण करणार? रेल्वेमंत्री म्हणाले, “आम्ही पुढील पाच वर्षांत…”
नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या अनुषंगाने नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात गुप्तचरावर आधारित कारवाईसाठी तसेच दुर्गम गावांमध्ये विकासकामे करण्यासाठी नागरी अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस (एफओबी) उघडण्यास गती दिली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरपासून ३३ एफओबी स्थापन करण्यात आले आहेत. या माध्यमातून नक्षलवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांना मोठी मदत होत आहे.
गडचिरोलीमध्ये वाढीव सुरक्षा
अबूझमाड हा नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असून तेथूनच गडचिरोलीसाठी घातपाती कारवायांचा कट रचला जातो. या पार्श्वभूमीवर या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे गडचिरोलीशी काही संबंध आहेत का, याची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र अद्याप संबंधित नक्षल्यांचा गडचिरोलीशी संबंध असल्याची माहिती समोर आलेली नसल्याचे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले. या चकमकीनंतर गडचिरोलीमधील सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाली आहे. नक्षल्यांनी जिल्ह्यात प्रवेश करु नये, यासाठी सुरक्षा यंत्रणा खडा पहारा देत आहेत.
चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांची नेमकी संख्या अजून स्पष्ट झालेली नाही. एकेक मृतदेह शोधून जंगलाबाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मृत नक्षल्यांची ओळख पटल्याशिवाय त्यांचा महाराष्ट्रातील घातपाती कारवायांत सहभाग होता किंवा नाही हे सांगता येणार नाही.
– प्रभात कुमार, पोलीस अधीक्षक, नारायणपूर, छत्तीसगड