वृत्तसंस्था, डेर अल-बलाह

इस्रायलने मंगळवारी भल्या पहाटे संपूर्ण गाझामध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये ४००पेक्षा जास्त पॅलेस्टिनी मारले गेले. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्याशिवाय ५००पेक्षा जास्त व्यक्ती जखमी झाल्याचे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले. या हल्ल्यांबरोबरच इस्रायलने हमासबरोबर जानेवारीपासून अंमलात आलेला युद्धविरामाचा करार संपुष्टात आणला आहे. दुसरीकडे, हल्ल्यांपूर्वी इस्रायलने आपल्याशी सल्लामसलत केल्याचे सांगत व्हाइट हाऊसने या हल्ल्यांना पाठिंबा दिला.

युद्धविरामाच्या करारामध्ये बदल करण्याची इस्रायलची मागणी मान्य करण्यास हमासने नकार दिल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी गाझावर हल्ले करण्याचे आदेश दिले. अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, हे युद्ध संपण्याची कोणतीही मुदत नसून ते अधिक विस्तारण्याची शक्यता आहे. यापुढे इस्रायल आता हमासविरोधात वाढीव लष्करी ताकदीने कारवाई करेल असे नेतान्याहू यांच्या कार्यालयाने सांगितले. हमासने अद्याप हल्ल्यांना उत्तर दिलेले नाही. इस्रायलच्या लष्कराने लोकांना पूर्व गाझाचा भाग, उत्तरेकडील बराचसा भाग आणि दक्षिणेचाही काही भाग रिकामा करण्याचे आणि गाझाच्या मध्य भागात जाण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले.

संबंधित घडामोडी

● हल्ल्यांमुळे पश्चिम आशियात तणाव वाढण्याची चिंता

● गाझाच्या अपुऱ्या सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये जखमींची गर्दी

● खान युनिस शहरामध्ये स्फोट आणि धुराचे लोट

● इस्रायल गाझामध्ये नरसंहार घडवत असल्याचा तुर्कियेचा आरोप

● इस्रायलबरोबर मैत्रीचे संबंध असलेला सौदी अरेबिया, मध्यस्थीसाठी पुढाकार घेणारे कतार आणि इजिप्तसह संयुक्त राष्ट्रांकडून हल्ल्यांचा निषेध

● इस्रायलमधील अतिउजवे नेते सदस्य इटामार बेन-ग्विर यांचा पक्ष पुन्हा नेतान्याहू यांच्या सरकारमध्ये सहभागी

युद्धविरामाच्या मुदतवाढीसाठी हमासने ओलिसांची सुटका करायला हवी होती. पण त्यांनी नकार दिला आणि युद्ध स्वीकारले. – ब्रेन ह्युजेस, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

हमासचा नेतान्याहू यांच्यावर आरोप : गाझावर हल्ल्यांचा निर्णय घेऊन नेतान्याहू यांनी ओलिसांचा जीव धोक्यात टाकला असल्याचा दावा हमासच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केला आहे. इस्रायलच्या पंतप्रधानांनी स्वत:चे सरकार वाचवण्यासाठी युद्ध पुन्हा सुरू केले अशी टीका हमासचा अधिकारी इज्जत अल-रिशकने केली. युद्धविराम कोणी मोडला हे मध्यस्थांनी सांगावे असे आवाहनही रिशकने केले.

Story img Loader