नवरात्र देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण. या नऊ दिवसांत देवीला सजविण्यासाठी आणि पूजेसाठी वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला जातो. यामध्येही प्रत्येक प्रांतातील पूजेची पद्धत वेगळी असल्याचे आपल्याला दिसते. कोलकातामधील संतोषपूर तलावाच्या जवळ असणाऱ्या एका देवीची पूजा करण्यासाठी तब्बल ४ हजार किलो हळदीचा वापर करण्यात आला. आता इतकी हळद वापरुन काय केले असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर या देवीचा मंडप तयार करण्यासाठी ही हळद वापरण्यात आली होती. हळद आरोग्यासाठी उपयुक्त असून त्याचा आहारात वापर आवश्यक आहे हा संदेश याद्वारे देण्यात आला. नवरात्रीच्या निमित्ताने हे आगळेवेगळे डेकोरेशन सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे ठरत आहे.
आता इतकी हळद कुठून आणली गेली? तर जेके मसाल्याचे मालक आणि मसाल्याचे व्यापारी असणारे अशोक जैन यांनी ही हळद देवीच्या सजावटीसाठी दिली होती. हळद ही आरोग्यासाठी अतिशय चांगली असल्याने आम्ही ही संकल्पना राबविण्याचे ठरवले. आरोग्य आणि सौंदर्य या दोन्ही गोष्टींसाठी हळद चांगली असल्याचेही ते म्हणाले. जेवणात हळदीला अनन्यसाधारण महत्त्व असून आपण त्याबाबत जागृती करत असल्याचेही ते म्हणाले. याठिकाणी भेट दिलेले भक्त राजीव लोढा म्हणाले, हळदीसारखा पदार्थ देवीच्या सजावटीसाठी वापरणे ही अतिशय वेगळी संकल्पना आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जा पसरते. जंतूंना मारण्यासाठी हळद अतिशय उपयुक्त असल्याने आम्ही ही अनोखी गोष्ट केल्याचे मंडळाच्या सदस्यांनी सांगितले. आमची ही संकल्पना पाहण्यासाठी दिल्ली, बंगळुरु येथून नागरिक येत असल्याचेही ते म्हणाले.