आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ व कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकांसाठी दिल्लीत कमी किमतीची ४० हजार घरे बांधण्याच्या प्रस्तावास दिल्ली सरकारने शनिवारी मंजुरी दिली. हा प्रस्ताव दीर्घकाळ प्रलंबित होता. मुख्यमंत्री शीला दीक्षित बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या.
राजधानीतील जहांगीरपुरी भागात सावदा घेव्रा व भाल्सवा परिसरात ही घरे उभारण्यात येणार आहेत. सावदा घेव्रा भागात सुमारे १०० एकरचा तर भाल्सवा भागात १०२ एकरच्या भूखंडावर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याद्वारे गरीबांसाठी सुमारे ४० हजार घरे विकसित करण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याखेरीज ‘राजीव आवास योजने’ अंतर्गतही सुमारे सहा हजार दोनशे फ्लॅट्स  बांधण्यात येणार आहेत.
बावना, नरेला आणि भोरगा भागातही झोपडपट्टीवासीयांसाठी येत्या सप्टेंबपर्यंत कमी किमतीच्या १४ हजार घरांचे वितरण करण्यात येणार आहे. या घरांच्या खरेदीसाठी केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने अर्थसहाय्य दिले आहे. विविध ठिकाणी सुमारे ४८ हजार फ्लॅट्सच्या उभारणीचे काम सुरू असल्याचे शीला दीक्षित यांनी सांगितले.