अलीकडच्या काळात परदेशात शिक्षण घेण्यासाठी भारतीय विद्यार्थी धडपड करत असल्याचे पाहायला मिळते. अनेकांना परदेशात जाऊन पदवी मिळवायची असते जेणेकरून भविष्यात करिअरच्या अनेक संधी निर्माण होतील. यातील बहुतेक विद्यार्थी परदेशात शिक्षण पूर्ण करून तिथेच नोकरी शोधण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र विद्यार्थी आणि पालकांच्या या स्वप्नांना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर दिले. त्यांच्या उत्तरानुसार, २०१८ पासून परदेशात गेलेल्यांपैकी ४०३ विद्यार्थ्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे. नैसर्गिक मृत्यू, अपघात आणि वैद्यकीय कारणांमुळे मृत्यू झाल्याचे उत्तरात म्हटले आहे.
हे वाचा >> विश्लेषण: भारतीय विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती कॅनडाला… काय आहेत कारणे?
‘या’ देशात सर्वाधिक मृत्यू
व्ही. मुरलीधरन पुढे म्हणाले की, परदेशात नियुक्त असलेले भारतीय राजनैतिक अधिकारी आणि उच्चायुक्तालयातील अधिकारी त्या त्या देशातील विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमध्ये नियमित भेटी देतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात. मंत्रालयाने दिलेल्या उत्तरात मागच्या पाच वर्षांतली आकडेवारी देण्यात आली आहे. ज्यामध्ये सर्वाधिक ९१ मृत्यू कॅनडामध्ये झाले आहेत. त्यापाठोपाठ यूके (४८), रशिया (४०), युनायटेड स्टेट्स (३६), ऑस्ट्रेलिया (३५), युक्रेन (३१), जर्मनी (२०), सायप्रस (१४) तसेच इटली आणि फिलीपीन्स मध्ये प्रत्येकी १० मृत्यू झाले आहेत.
परदेशात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता भारत सरकारसाठी सर्वात महत्त्वाची आहे, त्यासाठी आम्ही काळजीपूर्वक लक्ष घालत आहोत. भारतीय दूतावास कार्यालय दक्ष राहून विद्यार्थ्यांच्या बाबतीत लक्ष घालत असतो. त्यांना परदेशात काय समस्या नाहीत ना? याची काळजी भारतीय राजनैतिक अधिकारी घेत असतात, असेही राज्यमंत्री मुरलीधरण यांनी सांगितले.
“परदेशात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्या घटनेचा योग्य तपास आणि दोषींना शिक्षा मिळावी, यासाठी यजमान देशाच्या संबंधित यंत्रणांशी ताबडतोब संपर्क साधून त्याचा पाठपुरावा केला जातो. जर भारतीय विद्यार्थी संकटात सापडले तर त्यांना आवश्यक अशी सर्व मदत करण्यात येते. ज्यामध्ये आपत्कालीन वैद्यकीय सेवा, राहण्याची आणि थांबण्याची सुविधा आणि समुपदेशन सारख्या सुविधा पुरविल्या जातात”, असेही मुरलीधरन यांनी सांगितले.
२०१८ पासून चारशेहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा आकडा एवढा मोठा का आहे? असाही प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी बाहेर उत्तर दिले. ते म्हणाले, परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागच्या काही काळात अनेकपटींनी वाढली आहे, त्यामुळे हा आकडा मोठा वाटतो.
बागची पुढे म्हणाले की, मला वाटतं सरकारने हा विषय प्राधान्यक्रमाने हाती घ्यावा, एवढाही गंभीर नाही. विद्यार्थ्यांच्या मृत्यूला वैयक्तिक कारणे कारणीभूत आहेत. अपघातासारख्या घटनांचा विचार केल्यास त्या कुणाच्याही हाती नाहीत. एखाद्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास परराष्ट्र खात्याचे अधिकारी संबंधित विद्यार्थ्याच्या कुटुंबाशी संपर्क साधतात. तसे काही प्रमाणात स्थानिक यंत्रणांशी संपर्क साधून पाठपुरावा केला जातो.
हे वाचा >> कोणत्या देशाला भारतीय विद्यार्थी प्राधान्य देतात?
भारतातील विद्यार्थी सध्या जगभरातील २४० देशांमध्ये शिक्षण घेत आहेत, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिली होती. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, यूके, यूएस हे देश विद्यार्थ्यांच्या पसंतीक्रमावर सर्वात वरच्या स्थानी आहेत. त्याशिवाय उझबेकिस्तान, फिलिपिन्स, रशिया, आयर्लंड, किर्गिजस्तान आणि कझाकस्तान या देशांमध्येही मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. करोना महामारीनंतर परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले, असे आकडेवारीवरून दिसून येत आहे. २०२२ या शैक्षणिक वर्षात परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येने मागच्या सहा वर्षांतील संख्येचा उच्चांक गाठला गेला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने संसदेत दिलेल्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये तब्बल ७.५ लाख विद्यार्थ्यांनी परदेशाची वाट धरली. याच वर्षात भारताने चीनलाही मागे टाकले. यूएसमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या देशांमध्ये भारत या वर्षात चीनच्याही पुढे गेला.
आणखी वाचा >> परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा विचार करत आहात? तर या पाच टिप्स जरूर वाचा
परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत २०१७ सालापासून सतत वाढ होताना दिसत आहे. २०१७ साली ४.५ लाख, २०१८ मध्ये ५.२ लाख, २०१९ मध्ये ५.८६ लाख विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेण्याचा मार्ग निवडला, असे सरकारची आकडेवारी सांगते.