Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून निर्णयांचा धडाका लावला आहे. यामध्ये प्रामुख्याने बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्धच्या मोहिमेचा मुद्दा असेल किंवा अमेरिकेच्या समृद्धीसाठी महत्वाचे निर्णय असतील किंवा नवीन टॅरिफ धोरण (आयात शुल्क) असेल, असे अनेक मोठे निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतले आहेत. एवढंच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांचा फटका जगातील अनेक देशांना बसला आहे. आता डोनाल्ड ट्रम्प आणखी एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत.
जगातील ४१ देशांना अमेरिकेत प्रवेश बंदी अर्थांत प्रवासावर निर्बंध लावण्याच्या तयारीत डोनाल्ड ट्रम्प आहेत. कोणत्या देशातील नागरिकांना अमेरिकेत निर्बंध असतील या संदर्भातील याद्या देखील तयार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भातील वृत्त न्यू यॉर्क टाईम्सच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. ४१ देशांतील नागरिकांसाठी अमेरिकेत प्रवेश रोखण्यासाठी किंवा प्रवासावर निर्बंध लावण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या हालचाली सुरू असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
प्रवेश बंदीचे तीन श्रेणीत विभाग
दरम्यान, ४१ देशांना अमेरिकेत प्रवेश बंदी करण्याच्या प्रस्तावात देशांचे तीन श्रेणीत विभाग करण्यात आले आहेत. यामध्ये एक रेड यादी, ज्यांच्या नागरिकांना प्रवेशापासून पूर्णपणे बंदी घातली जाईल. एक ऑरेंज यादी, जी निवडक निर्बंध लादेल. विशेषतः गैर-व्यावसायिक प्रवाशांवर. तसेच येलो यादी असेल. ज्या देशांना सुरक्षा कमतरता दूर करण्यासाठी किंवा अधिक प्रतिबंधात्मक यादीत ठेवण्याचा धोका आहे, त्यांना ६० दिवसांची अंतिम मुदत देण्यात येईल.
ही प्रस्तावित प्रवास बंदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात लागू केलेल्या प्रवास निर्बंधांपेक्षा व्यापक असेल, अशी माहिती सांगितली जात आहे. याबाबत सध्या उच्च राजनैतिक आणि सुरक्षा अधिकाऱ्यांकडून यावर विचार सुरु आहे. परराष्ट्र विभाग, गृह सुरक्षा विभाग आणि इतर गुप्तचर संस्थांचे अधिकारी याबाबतचा आढावा घेत असून यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, या निर्णयासाठी हालचाली सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
पहिल्या यादीत कोणत्या देशांचा समावेश?
वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने ४१ देशांच्या ३ याद्या तयार केल्या आहेत. यातील पहिल्या रेड यादीत १० देशांचा समावेश आहे. यात अफगाणिस्तान, भूतान, क्युबा, इराण, लिबिया, उत्तर कोरिया, सोमालिया, सुदान, सीरिया, व्हेनेझुएला या देशांचा असेल. या देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
दुसऱ्या यादीत कोणते देश?
ऑरेंज यादीत १० देशांचा समावेश असणार आहे. ज्यांच्यासाठी प्रवास प्रतिबंधित असेल, परंतु पूर्णपणे बंद केला जाणार नाही. या यादीत बेलारूस, इरिट्रिया, हैती, लाओस, म्यानमार, पाकिस्तान, रशिया, सिएरा लिओन, दक्षिण सुदान आणि तुर्कमेनिस्तान या देशांच्या नागरिकांना अधिक कडक प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य असेल.
तिसऱ्या यादीत कोणत्या देशाचा समावेश?
तिसऱ्या अर्थात पिवळ्या यादीतील देशांमध्ये प्रामुख्याने आफ्रिका, कॅरिबियन, अंगोला, अँटिग्वा, बारबुडा, बेनिन, बुर्किना फासो, कॅमेरून, केप व्हर्दे, चाड, काँगो प्रजासत्ताक, काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, डोमिनिका, विषुववृत्तीय गिनी, गांबिया, लायबेरिया, मलावी, माली, मॉरिटानिया, सेंट किट्स आणि नेव्हिस, सेंट लुसिया, साओ टोमे आणि प्रिन्सिपे, वानुआतु आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.