Firing In Rajdhani Express: जयपूर- मुंबई एक्सप्रेसमध्ये आरपीएफ जवानाने एका प्रवाशाची हत्या केल्याची घटना ताजी असताना आता सियालदह-राजधानी एक्सप्रेसमध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त समोर येत आहे. १२ ऑक्टोबरला गुरुवारी धनबाद स्थानकातून ट्रेन पकडलेल्या ४१ वर्षीय इसमाने गोळीबार केला होता. याबाबत माहिती मिळताच पोलिसांकडून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
हिंदुस्थान टाइम्सने रेल्वे अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार झारखंडमधील धनबाद स्टेशनवरून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवासी चढले होते. पूर्व रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरविंदर सिंग (41) नावाच्या प्रवाशाने कोच अटेंडंटशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि नंतर त्याच्या पिस्तुलातून गोळीबार केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की “या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. सदर प्रवाशाला कोडरमा येथे उतरवून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे”. संबंधित प्रवाशी मद्यधुंद अवस्थेत होता का, याचा पोलिस तपास करत आहेत.
एबीपी न्यूजच्या माहितीनुसार, हरविंदर यास नवी दिल्लीपर्यंत प्रवास करायचा होता. तो चुकून हावड़ा राजधानी एक्सप्रेसच्या ऐवजी सियालदह राजधानी एक्सप्रेसमध्ये चढला होता. त्यामुळे सीट नसल्याने तो बी- ८ बोगीच्या शौचालयाजवळ उभा होता. २०१९ मध्ये तो सैन्यातून निवृत्त झाल्याचे सुद्धा सांगितले जात आहे. त्याच्याकडे पिस्तूल बाळगण्याचा परवाना सुद्धा होता. भांडणादरम्यान चुकून त्याच्या हातून गोळी चालवली गेली असावी असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हरविंदरने सुद्धा आपण मुद्दाम गोळीबार केला नाही असे स्पष्टीकरण दिले आहे.
हे ही वाचा << “घटस्फोटित बनून मरायचे नाही, मी..”, ८२ वर्षीय पत्नीच्या पाठीशी सर्वोच्च न्यायालय! ८९ वर्षीय पतीची याचिका काय?
दरम्यान, जुलैमध्ये जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबाराची घटना घडली होती, ज्यामध्ये रेल्वे संरक्षण दलाचे (RPF) कॉन्स्टेबल चेतन चौधरी याने तीन प्रवाशांना गोळ्या घालून ठार केले होते. सदर आरपीएफ जवानाचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्याने त्याने गुन्हा केल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.