सलग दोनदा सत्तेत आलेल्या काँग्रेसने दिल्लीचा जरासाही विकास केला नाही. याउलट राष्ट्रीय राजधानी असुरक्षित झाली. विकासाचा दावा करणाऱ्यांनी याचाही विचार करावा, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केली. दिल्लीच्या विकासासाठी भाजपच्या हाती सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी केले. गतवर्षी दिल्लीत झालेल्या पाशवी बलात्कार प्रकरणाची आठवण करून देत राजनाथ सिंह यांनी महिला सुरक्षेच्या मुद्दय़ावरून विरोधकांना लक्ष्य केले. दिल्लीत अजूनही ४५ टक्के जनता राहत असलेल्या वसाहतींची स्थिती बकाल आहे, असा दावा त्यांनी केला.
ते म्हणाले की, काँगेस सरकारने राज्यात केवळ विकासाचा भास निर्माण केला. उड्डाणपूल बांधल्याचा दावा करणाऱ्या दीक्षित यांना दिल्लीतील वाहतुकीची समस्या माहीत नाही का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दिवसभराची गुजराण करण्यासाठी सतत बारा-बारा तास काम करणारा मोठा वर्ग दिल्लीत आहे. हा वर्ग प्रामुख्याने ऑटोचालक, सायकल रिक्षा चालक, हमाली करणाऱ्यांचा आहे. १६३९ अनधिकृत वसाहती, ८६० झोपडपट्टय़ा व ३६० ग्रामीण भाग दिल्लीत आहे. एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ४५ टक्के नागरिक या भागात राहतात. गेल्या दहा वर्षांत त्यांच्या विकासाच्या कोणत्या योजना दिल्ली सरकारने राबविल्या, असा प्रश्न राजनाथ सिंह यांनी विचारला. राज्यात सत्तेत आल्यास या वर्गाच्या उन्नतीसाठी भाजप अटलबिहारी वाजपेयी पुनर्वास योजना राबविणार असल्याचे आश्वासन राजनाथ सिंह यांनी दिले. विशेष म्हणजे हा वर्ग पारंपरिक काँग्रेसचा समर्थक मानला जातो. भाजपने पहिल्यांदाच या वर्गावर दिल्लीत लक्ष केंद्रित केले आहे.
४५ टक्के दिल्लीकर बकाल वस्तीत -राजनाथ
सलग दोनदा सत्तेत आलेल्या काँग्रेसने दिल्लीचा जरासाही विकास केला नाही. याउलट राष्ट्रीय राजधानी असुरक्षित झाली. विकासाचा दावा करणाऱ्यांनी याचाही विचार करावा,
First published on: 30-11-2013 at 01:46 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 45 of delhi people living in undeveloped colony rajnath singh