पोर्तुगीजांच्या तावडीतून ५१ वर्षांपूर्वी मुक्ती मिळाल्यानंतर पाच वर्षांनी गोव्यामध्ये घेण्यात आलेला जनमत कौल बनावट असल्याचा दावा करून गोव्याच्या माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांनी एका नव्या वादाला फोडणी दिली आहे. श्रीमती काकोडकर या गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कन्या असून तब्बल ४६ वर्षांनंतर त्यांनी हा दावा केल्यामुळे गोव्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करायचे की राज्य म्हणून त्याचे स्वतंत्र अस्तित्व ठेवायचे, या मुद्दय़ावरून ४६ वर्षांपूर्वी घेण्यात आलेला जनमत कौल आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘१६ जानेवारी १९६७ रोजी केंद्र सरकारने घेतलेला हा जनमत कौल बनावट होता’, असा दावा शशिकला काकोडकर यांनी बुधवारी केला. हा जनमत कौल म्हणजे एक प्रकारचा फार्सच होता आणि आपले वडील, दयानंद बांदोडकर हे गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करण्याच्याच बाजूने होते, असेही काकोडकर यांनी म्हटले आहे. हा जनमत कौल घेण्यात आला, त्या वेळी मोठय़ा प्रमाणावर गैरप्रकार घडले, असा आरोप काकोडकर यांनी केला. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो यांनी तर आपण १५ वर्षांचे असतानाही जनमत कौलानिमित्त घेण्यात आलेल्या मतदानात भाग घेतल्याची एका जाहीर सभेत कबुली दिली होती, याकडे काकोडकर यांनी लक्ष वेधले. विलीनीकरणाविरोधातील लॉबीने विरोधी मतदान करण्यासाठी राज्याबाहेरील माणसेही आणली होती, असाही आरोप काकोडकर यांनी केला.
गोवा विधिमंडळ सत्राच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त राज्य सरकारने बुधवारी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात जनमत कौलावरून वादास प्रारंभ झाला. विलीनीकरणविरोधी नेते आणि माजी मंत्री राधाराव ग्रेसियस यांनी या कार्यक्रमात ‘भाऊसाहेब बांदोडकर हे गोवा उद्ध्वस्त करायलाच उभे ठाकले होते’, या शब्दांत  टीकेची तोफ डागली आणि तेथेच वादाची ठिणगी पडली.
तत्कालीन विरोधी पक्षनेते जॅक डी सिक्वेरा यांनी त्या काळात गोव्याचे रक्षण केले, असा दावा करून सिक्वेरा यांच्यामुळेच तर आज आपण या ठिकाणी विधिमंडळाचा सुवर्णमहोत्सव साजरा करू शकत आहोत, असे ग्रेसियस ठामपणे म्हणाले. गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करण्याचा घाट घालून भाऊसाहेबांनी गोव्याला नष्ट करण्याचाच चंग बांधला होता, या शब्दांत ग्रेसियस यांनी टीकास्त्र सोडले.
या सर्व आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे उपस्थित होते परंतु संबंधित वादावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे त्यांनी टाळले. या वादात आपण पडू इच्छित नाही परंतु भाऊसाहेबांनी गोव्यासाठी दिलेले योगदान आपण विसरू शकत नाही. गोवा स्वतंत्र राहिला पाहिजे, म्हणून ज्या अनेक कारणांमुळे लोकांनी मतदान केले, त्यापैकी एक कारण म्हणजे गोव्याची जनता भाऊसाहेबांना मुख्यमंत्री म्हणून गमावू इच्छित नव्हती, असा दावा पर्रिकर यांनी केला.

Story img Loader