Daily Road Accident Deaths In India : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या अहवालात २०२२ मध्ये दररोज किमान ४६२ लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले होते, असे समोर आले आहे. अहवालानुसार, २०२२ मध्ये देशात दररोज किमान १,२६४ रस्ते अपघात झाले होते. “भारतातील रस्ते अपघात” या वार्षिक अहवालात मृत्यूंचे भयावह चित्र समोर आले आहे, मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी बहुतेकजण २५-३५ वयोगटातील आहेत. आकडेवारीवरून असेही दिसून आले आहे की, २०२२ मध्ये रस्ते अपघातात सुमारे १.६८ लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी किमान ४२,६७१ जण २५-३५ वयोगटातील होते. दरम्यान २०२२ मध्ये तामिळनाडूमध्ये सर्वाधिक ६४,१०५ रस्ते अपघात झाले, तर उत्तर प्रदेशात सर्वाधिक २२,५९५ मृत्यू झाले होते.

कोणत्या राज्यात सर्वाधिक अपघाती मृत्यू?

रस्ते अपघातांची संख्या जास्त असलेल्या इतर राज्यांमध्ये मध्य प्रदेश (५४,४३२), केरळ (४३,९१०) आणि उत्तर प्रदेश (४१,७४६) यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशनंतर, रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू तामिळनाडूमध्ये झाले आहेत ज्यात १७,८८४ जणांच्या मृत्यूंचा समावेश आहे. त्यानंतर महाराष्ट्रात १५,२२४ जणांचे मृत्यू झाले आहेत, तर मध्य प्रदेशात १३,४२७ मृत्यू झाले आहेत.

रस्ते अपघातांमध्ये १२% वाढ

२०२१ च्या तुलनेत, २०२२ मध्ये रस्ते अपघातांमध्ये १२% वाढ झाली आहे, तर मृत्यूमुखी पडणाऱ्यांची टक्केवारी ९ ने वाढली आहे. २०२२ मध्ये एकूण रस्ते अपघातांची संख्या ४.६१ लाख होती, जी २०२१ मध्ये ४.१२ लाख होती.

वयोगटानुसार अपघाती मृत्यूंची आकडेवारी

अधिकृत आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये रस्ते अपघातांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांची एकूण संख्या ९,५२८ होती, जी २०२१ मध्ये ७,७६४ होती. २०२२ मध्ये ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या एकूण १३,६३६ जणांचे अपघाती निधन झाले होते, तर २०२१ मध्ये हीच संख्या ११,७३९ इतकी होती.

लक्षद्वीपमध्ये २०२२ मध्ये सर्वात कमी ३ अपघात झाले होते, तर मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या दोन अशी होती.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या एका अहवालात वेग, बेपर्वा वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे आणि वाहतूक कायद्यांचे पालन न करणे यासारखी कारणे अपघातांचे मूळ कारण असल्याचे म्हटले आहे.

Story img Loader