मिझोरमच्या दोन बलात्कार पिडीत महिलांना केंद्र सरकारने प्रत्येकी ५ लाख रूपये भरपायी देत तब्बल ४७ वर्षांनंतर सहानुभूती दाखवली आहे. या दोन महिलांवर ४७ वर्षांपूर्वी भारतीय सैन्यदलाच्या जवानांनी पाशवी बलात्कार केला होता. या दोन पिडीत महिला २० वर्षांपूर्वीच्या उत्तर-पूर्वेत झालेल्या भारता विरूध्दच्या बंडाळीमध्ये सहभागी होत्या.
सरकारच्या या सहानुभूतीमुळे “त्याना आनंदाश्रु आवरता आले नाही,” असे त्यांच्या नातेवाईकांनी संडे एक्स्प्रेसला सांगितले. मिझो नॅशनल आर्मीच्या(एमएनए) माजी सदस्य असलेल्या या दोघींना केंद्राकडून मदत मिळवून देण्यासाठी माजी सनदी अधिकारी(आयएएस) एच. व्ही. लालरिंगा यांनी सहकार्य केले. मिझो नॅशनल आर्मी ही मिझो नॅशनल फ्रंटची(एमएनएफ) सशस्त्र संघटना आहे. या संघटनेने १९६६ ते १९८६ दरम्यान स्वायत्तप्रदेश निर्मितीसाठी भारतीय सैन्यदलांच्या विरूध्द गनिमी युध्दकेले.
माजी एमएनएच्या सदस्य असलेल्या या दोन पिडीत महिलांनी लालरिंगा यांच्यासह १६ मे रोजी केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंह यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. या भेटीमध्ये सिंह यांनी पिडीत महिलांना शासकीयमदत मिळवण्यासाठी बँकेमध्ये खाती उघडण्याचा सल्ला दिला होता. असे सूत्रांकडून सांगण्यात आले. गृहमंत्रालयाच्या मंजूरी नंतर या दोन महिलांच्या बँक खात्यांमध्ये केंद्रसरकारच्या गुप्त निधी मधून प्रत्येकी ५ लाख रूपये वर्ग करण्यात आले आहेत. मात्र, गृहमंत्रालयाच्या अधिका-यांनी याबद्दल बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
“बँक अधिका-यांकडून बुधवारी माझ्या बहिणीच्या खात्यांवर पैसे जमा झाल्याचे समजल्यावर मला रडू कोसळले. माझ्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराचा व तिने सोसलेल्या यातनांचा थोडाफार विचार झाला,” असे त्यातील एका पिडीत महिलेचा भाऊ जे. लालदुला साईलो यांनी संडे एक्स्प्रेसला सांगितले.

Story img Loader