पाकिस्तानात अल्पसंख्याक शिया पंथियांविरोधातील हिंसाचाराने रविवारी अधिक उग्र रूप धारण केले असून कराचीत शियाबहुल वस्तीत झालेल्या दोन भीषण बॉम्बस्फोटांत ४८ जण मृत्युमुखी पडले तर १४० जखमी झाले. जखमी आणि मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
पहिला स्फोट कराचीच्या अब्बास उपनगरातील इमामबरगाह या नमाज पठणाच्या सभागृहाबाहेर सायंकाळी सात वाजता झाला. लोक नमाज पठण करून बाहेर पडत असतानाच झालेल्या या स्फोटाने एकच हाहाकार माजला. दुसरा स्फोट दहा मिनिटांच्या अंतराने झाला. या स्फोटाने परिसरातील इमारतींचेही नुकसान झाले तर अनेक दुकाने बेचिराख झाली.
रुग्णालयात दाखल झालेल्या अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याचीच भीती आहे.
पहिला स्फोट हा एका मोटारगाडीत लपविलेल्या स्फोटकांद्वारे केला गेला, असे पोलिसांनी सांगितले. ही गाडी सभागृहाच्या दाराजवळच उभी केली होती. स्फोटामुळे सभागृहाच्या प्रवेशद्वाराशी चार फूट खोल भगदाड पडले, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मन्झर मसवानी यांनी सांगितले. स्फोटाचा आवाज दहा किलोमीटर अंतरावरही ऐकू आला. या बॉम्बमध्ये १५० किलोची स्फोटके वापरल्याचा तर्क आहे. दुसरा स्फोट हा गाडीतील गॅस सिलिंडरचा झाला, असे समजते. त्याला दुजोरा मात्र मिळालेला नाही.
रविवारीच सिंधच्या मुख्यमंत्र्यांच्या एका निकटच्या सहकाऱ्याचा साखरपुडा होता. त्यासाठी पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा त्यांच्या सुरक्षेतच गुंतली असताना हे स्फोट झाले. त्यानंतर बडय़ा नेत्यांनी स्फोटस्थळी धाव घेतली आणि मदतकार्यावर तसेच तपासकार्यावर जातीने देखरेख सुरू केली.
या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. मात्र पाकिस्तानात लष्कर ए जंगवी ही संघटना शियाविरोधी हिंसाचार करीत आहे. गेल्या महिन्यात क्वेट्टा येथे बॉम्बस्फोटात ९१ जण ठार झाले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा