49 Lok Sabha Opposition MPs suspended : संसदेच्या सुरक्षाभंगाच्या प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनासाठी गेल्या आठवड्यापासून विरोधी सभागृहामध्ये आक्रमक झाले आहेत. अशातच आजही ( १९ डिसेंबर ) लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या ४९ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या १४१ पर्यंत पोहोचली आहे.
यापूर्वी झालेल्या खासदारांच्या निलंबाबत चर्चा आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सुरक्षाभंगावरून निवेदनासाठी देण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी मंगळवारी ( १९ डिसेंबर ) गोंधळ घातला. यानंतर संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेले राजेंद्र अग्रवाल यांनी मंजूर केला.
निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये काँग्रेस नेते शशी थरूर, मनिष तिवारी, कार्ति चिदंबरम, एम. डी फैजल, फारूक अब्दुल्ला, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, दानिश अली, माला रॉय, डिपंल यादव, सुशील कुमार रिंकू यांच्यासह ४९ जणांचा समावेश आहे.
शुक्रवारी ( १५ नोव्हेंबर ) लोकसभेतील १३ आणि राज्यसभेतील १ खासदाराचं निलंबन करण्यात आलं होतं. त्यानतंर सोमवारी ( १८ नोव्हेंबर ) लोकसभेतील ३३, तर राज्यसभेतील ४५ अशा ७५ खासदारांना निलंबित करण्यात आलं. आता मंगळवारी ( १९ डिसेंबर ) लोकसभेतील ४९ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या १४१ वर पोहोचली आहे.