आर्ट ऑफ लिव्हिंग (एओएल) संस्थेने कार्यक्रमापूर्वी पाच कोटींची रक्कम न भरल्यास आमच्यासमोर कायदेशीर कारवाईचे पर्याय खुले आहेत, असे राष्ट्रीय हरित लवादाने ठणकावून सांगितले होते. मात्र, केवळ तीन दिवसांतच लवादाने यावरून घुमजाव करत एओएलला केवळ २५ लाख रूपये भरून कार्यक्रमासाठी परवानगी दिली. श्री श्री रविशंकर यांनी पाच कोटी रुपयांचा दंड देणार नाही, हवेतर तुरुंगात जाईन, अशी भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाच्या भूमिकेत अचानक झालेल्या या बदलाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
रविशंकर नमले, पाच कोटी देण्याची तयारी
श्री श्री रविशंकर यांनी शुक्रवारी नमते घेत पाच कोटी रुपयांचा दंड भरण्याची तयारी दाखवली. इतकी मोठी रक्कम या घडीला भरता येणे शक्य नसल्याने लवादाने महिनाभराची मुदत द्यावी, अशी विनंती करीत त्यांनी २५ लाख रुपये लवादाकडे जमा केले. ही रक्कम एकुण रक्कमेच्या पाच टक्के इतकीच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत यमुनेच्या पूरप्रवण क्षेत्रात ‘वर्ल्ड कल्चरल फेस्टिव्हल’ सांस्कृतिक महासोहळ्याचा काल दिमाखात शुभारंभ झाला. श्री श्री रविशंकर यांच्या वक्तव्यानंतर हरित लवादाने आम्ही भरायला सांगितलेली पाच कोटींची रक्कम हा दंड नसून पर्यारवण भरपाई असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. तत्पूर्वी बुधवारी हरित लवादाने यमुनेच्या पूरप्रवण क्षेत्रात कार्यक्रमाच्या आयोजनामुळे पर्यावरणाचा हानी होत असल्याचे सांगत एओएलला पाच कोटी रूपये भरण्याचे आदेश दिले होते. मात्र, शुक्रवारी लवादाने आपली भूमिका बदलत एओएलला सुरूवातीला पाच टक्के रक्कम आणि उर्वरित रक्कम महिनाभरात भरण्याची मुभा दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा