मोरेना : मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यातील एका कारखान्यात बुधवारी विषारी वायूमुळे तीन भावांसह पाच मजुरांचा मृत्यू झाला. हा कारखाना जिल्ह्यातील धनेला भागात आहे. साक्षी फूड प्रोडक्ट्स या कारखान्यातील एका टाकीतून सकाळी ११ वाजताच्या सुमारास वायू गळती झाली. त्यानंतर दोन मजूर तपासण्यासाठी टाकीत गेले होते. परंतु वायूमुळे ते अत्यवस्थ झाले, असे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) भूपेंद्र सिंह कुशवाह यांनी सांगितले.
हेही वाचा >>> पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त देशभर ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रम
या घटनेनंतर आणखी तीन मजुरांना वायूचा त्रास झाला. या पाचही जणांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, असे कुशवाह यांनी सांगितले. कारखान्यात अन्नपदार्थामध्ये वापरल्या जाणाऱ्या चेरी आणि ‘शुगर फ्री’ रसायनाची निर्मिती करण्यात येते. मृताची नावे रामवतार गुर्जर (३५), रामनरेश गुर्जर (४०), वीरसिंग गुर्जर (३०, सर्व रा. टिकटोली गाव), गणेश गुर्जर (४०) आणि गिरराज गुर्जर (२८) अशी आहेत.