बंगळूरु : बंगळूरुत ‘लष्कर-ए-तैयबा’ या दहशतवादी संघटनेच्या पाच संशयित दहशतवाद्यांना केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) अटक केली. भारतात दहशतवादी कारवायांसाठी कट्टरपंथी बनवलेल्या या पाच जणांकडे १२ मोबाइल फोन, पिस्तूल, काडतुसे आणि बंदूक आणि बाँबसाठी वापरण्यात येणाऱ्या दारूगोळय़ाचा मोठा साठा जप्त केला. बंगळूरुचे पोलीस आयुक्त बी. दयानंद यांनी बुधवारी ही माहिती दिली. मोठा घातपात घडवण्याचा त्यांचा कट असल्याचा संशय आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, संशयितांच्या ताब्यातून सात पिस्तुले, ४५ काडतुसे, ‘वॉकीटॉकी’, काही खंजीर आणि मोठय़ा प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्याविरुद्ध कठोर बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्यातील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहेल, उमर, जाहिद, मुदासीर आणि फैजल अशी संशयितांची नावे असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पाच संशयितांना शहरातील सुलतानपाल्या भागातील कनकनगर येथील प्रार्थनास्थळाजवळ मोठा कट रचत असताना अटक करण्यात आली.
दयानंद यांनी पत्रकारांना सांगितले, की केंद्रीय गुन्हे शाखेला समाजविघातक शक्तींचा कट उघडकीस आणण्यात आणि त्यांचे विघातक मनसुबे उधळून लावण्यात यश मिळाले आहे. हेब्बल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी छापा टाकून सर्व संशयितांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्याने सांगितले की, संशयितांना टी. नझीर आणि जुनैद नावाच्या दहशतवादी सूत्रधारांनी कट्टरपंथी बनवले होते. २००८ च्या बंगळूरु साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात नाझीर आरोपी आहे. तर, जुनैद परदेशात फरार होऊन लपला आहे. अटक केलेल्या संशयितांवर खून, दरोडा, लाल चंदन तस्करी आणि इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. संशयित नझीरच्या संपर्कात होते. पोलीस आयुक्तांनी सांगितले की, नझीरचे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तैयबा’शी संबंध होते आणि त्याच्या टोळीचे सदस्य मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत होते.
परदेशात लपलेल्या आणखी एका दहशतवादी सूत्रधारावर २०१७ मध्ये त्याचा प्रतिस्पर्धी नूर अहमदची हत्या केल्याचा आरोप आहे. अहमदच्या हत्येप्रकरणी २१ जणांना अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याच हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या २१ जणांमध्ये पाच संशयितांचाही समावेश आहे. आम्ही संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे आणि तपासासाठी त्यांना १५ दिवसांची कोठडी दिली आहे, अशी माहितीही दयानंद यांनी दिली.
पुढील तपासात दहशतवादी कारवायांत आणखी किती जण सामील आहेत आणि ते कोणत्या संघटनांशी संबंधित आहेत हे उघड होईल, असे सांगून दयानंद म्हणाले, की अटक केलेल्या संशयितांना परदेशात लपलेल्या त्यांच्या एका दहशतवादी म्होरक्याने शस्त्रे आणि इतर साहित्य पुरवले होते आणि त्यांना मोठा दहशतवादी कट अमलात आणण्याचे आदेश दिले होते.
भाजपची काँग्रेसवर टीका कर्नाटकातील विरोधी पक्ष भाजपने राज्यात काँग्रेस सरकार दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला. भाजपचे आमदार आणि माजी मंत्री आर. अशोक यांनी राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यापासून दहशतवादी कारवाया करण्यासाठी ‘देशद्रोही शक्तीं’चे धारिष्टय़ वाढल्याची टीका केली. माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या टोळीला पकडून कट उधळल्याबद्दल ‘सीसीबी’ची प्रशंसा केली. हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्याची मागणीही त्यांनी केली.