पंजाबमधील जालंदर येथे खळबळजनक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. कर्जबाजारीपणामुळे कुटुंबानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. मृतांमध्ये एक पुरूष, ३ महिला आणि एका ३ वर्षाच्या चिमुरडीचा समावेश आहे. पोलिसांनी मृतदेह जालंदर रूग्णालयात पाठवले आहेत.
मनमोहन सिंग ( ५५ वर्षे ), पत्नी सरबजीत कौर, दोन मुली ज्योती ( ३२ वर्षे ), गोपी ( ३१ वर्षे ) आणि ज्योतीची मुलगी अमन ( ३ वर्षे ) अशी मृत्यू झालेल्या पाच जणांची नावे आहेत.
हेही वाचा : नववर्षाच्या पार्टीत वकिलाची जातीवाचक टिप्पणी; संतापलेल्या सुरक्षा रक्षकाने थेट गोळ्या झाडल्या, पुढे..
मनमोहन सिंग यांचे जावई सरबजीत सिंग कुटुंबाशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. पण, कुणाशीही संपर्क झाला नाही. त्यामुळे सरबजीत सिंग मनमोहन सिंग यांच्या घरी गेले. तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली. सरबजीत सिंग यांना मनमोहन सिंग आणि त्यांची पत्नी सरबजीत कौर यांचे मृतदेह पंख्याला लटकलेले दिसले. तर, ज्योती, गोपी आणि अमन यांचे मृतदेह बेडवर आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच जालंदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनजीत सिंग आणि आदमपूर पोलीस उपअधीक्षक ( डीएसपी ) विजय कुंवर सिंग घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना तपासावेळी एक सुसाईड नोट आढळून आली. कर्जाला आणि भांडणास कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं मनमोहन सिंग यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.
सर्वांच्या मानेवर जखमेच्या खुणा असून गळफास घेऊन मृत्यू झाल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. चिमुरडी अमनच्या गालावर जखमेच्या खुणा आढळल्या आहेत. कुणीतरी अमनचा गळा आवळून लावून हत्या केल्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यानं वर्तवली आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह जालंदर सिव्हिल रूग्णालयात पाठवले आहेत.