हवाई दलाचे ‘सी-१३०जे’ हे अमेरिकी बनावटीचे विमान आग्रा येथील हवाई तळावरून उड्डाण केल्यानंतर ग्वाल्हेरनजीक शुक्रवारी कोसळून पुण्याचे प्रशांत अशोक जोशी यांच्यासह पाच जण ठार झाले. मृतांमध्ये विंग कमांडर आर. नायर, स्क्वाड्रन लीडर के. मिश्रा, स्क्वाड्रन लीडर ए. यादव (नेव्हीगेटर) वॉरंट ऑफिसर के. पी. सिंग (फ्लाइट इंजिनीयर) यांचा समावेश आहे. हे विमान प्रशिक्षणार्थीना घेऊन आग्रा विमानतळावरून सकाळी उडाले होते. अपघाताबाबत चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
भारताने ही विमाने अमेरिकेकडून अलीकडेच खरेदी केली होती. त्या एका विमानाची किंमत १००० कोटी रूपये आहे. ही विमाने २० टन वजन कमी अंतरापर्यंत वाहून नेतात. तातडीच्या वेळी सैन्य सीमेवर हलवण्याची भारताची क्षमता त्यामुळे वाढली असतानाच आता या अपघाताने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दुर्दैवी योगायोग
सप्टेंबर २००१मध्ये पुण्याचेच फ्लाइट लेफ्टनंट अभिजीत गाडगीळ
यांचा प्रशिक्षण उड्डाणादरम्यान अंत ओढवला आणि वीरमाता कविता गाडगीळ यांच्या अथक लढय़ानंतर जुनाट मिग २१ विमाने २०१४पर्यंत हवाई दलातून काढून टाकण्याचे आश्वासन संरक्षण मंत्र्यांना द्यावे लागले होते. दुर्दैवी योगायोग म्हणजे अद्ययावत अशा ‘सी-१३० जे’ या अमेरिकन बनावटीच्या विमानालाही अपघात होऊन त्यात पुण्याचेच प्रशांत जोशी यांना प्राण गमवावे लागले आहेत. हे मालवाहू विमान नित्याप्रमाणे प्रशिक्षण उड्डाणासाठी निघाले होते, असे सांगण्यात
आले. विमानात जोशींसह सर्वच अधिकारी अत्यंत अनुभवी होते.
त्यामुळे या अपघाताबद्दल हवाई दलातही आश्चर्य आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
पदोन्नती लवकरच अपेक्षित होती..
प्रणव कुलकर्णी, पुणे
हवाई दलाच्या मालवाहक विमानाला ग्वाल्हेरजवळ झालेल्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले विंग कमांडर प्रशांत अशोक जोशी हे पुण्यातील रहिवासी होते. पत्नी, वडील व सासरे आदी सर्व जण हवाई दलाशी संबंधित
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून शिक्षण घेतलेल्या जोशी यांनी १९९५ मध्ये हवाई दलामध्ये प्रवेश केला होता. अल्पावधीतच त्यांनी हवाई दलात आपला ठसा उमटविला होता. मागील तीन वर्षांपासून ते आग्रा येथील िहडन एअरपोर्ट बेस येथे कार्यरत होते. त्यांना दोन मुले असून, मोठा मुलगा अजिंक्य आठ वर्षांचा, तर अखिल हा दोन वर्षांचा आहे. पत्नी अनिता व मुलांसोबत ते सध्या नोकरीच्या ठिकाणीच राहत होते. मुलांच्या शाळांना सुटय़ा लागल्याने अनिता त्यांना घेऊन औंध येथील घरी आल्या होत्या. पाडव्याला त्या पुन्हा परतणार होत्या, त्यापूर्वीच ही घटना घडली. अनिता याही पूर्वी हवाई दलात कार्यरत होत्या. जोशींचे वडील, तसेच सासरे शरद आपटे हेही हवाई दलामध्ये कार्यरत होते.
उद्या (शनिवारी) िहडन एअरपोर्ट बेस येथे प्रशांत जोशी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा