खगोलवैज्ञानिकांनी आतापर्यंत ज्ञात असलेला सर्वात जुना तारा शोधून काढला असून त्याच्याभोवती पृथ्वीपेक्षा लहान आकाराचे पाच ग्रह फिरत असल्याचे सांगण्यात आले. विश्व निर्मितीच्या प्रक्रियेवेळी या ग्रहांची निर्मिती झाली असावी. नासाच्या केप्लर दुर्बिणीने मिळवलेल्या माहितीच्या आधारे हा तारा व त्याचे ग्रह शोधण्यात आले आहेत.
ज्या ताऱ्याभोवती हे ग्रह फिरत आहेत त्याचे नाव केप्लर ४४४ असून त्याच्या भोवती पृथ्वीपेक्षा लहान आकाराचे पाच ग्रह फिरत आहेत. त्यांचा आकार बुध व शुक्र या ग्रहांच्या दरम्यानचा आहे. अतिशय जुन्या ताऱ्याभोवती हे ग्रह फिरत असून त्यामुळे तो एक विशेष तारा आहे असे सिडनी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फिजीक्सचे डॉ. डॅनियल ह्य़ूबर यांनी म्हटले आहे. विश्वनिर्मितीच्यावेळी हा तारा व ग्रहांची निर्मिती झाली. विश्वाचे वय एक पंचमांश असताना ही निर्मिती झाली. केप्लर ४४४ तारा हा सौरमालेच्या अडीच पटींनी जुना आहे. आपल्या सौरमालेचे वय त्यावेळी ४.५ अब्ज वर्षे होते. विश्वाच्या प्रत्येक अवस्थेत ग्रह ताऱ्यांची निर्मिती झाली आहे व नेमकी ही प्रक्रिया नेमकी केव्हा सुरू झाली याची माहिती यात मिळेल, असे ह्य़ूबेर यांनी सांगितले. पृथ्वीच्या आकाराचे ग्रह विश्वाच्या १३.८ अब्ज वर्षांच्या इतिहासात तयार झाले व त्यावरून प्राचीन दीर्घिकांच्या अस्तित्वाची माहिती मिळेल असे बर्मिगहॅम विद्यापीठाचे डॉ. टियागो कॅम्पान्टे यांनी म्हटले आहे. ते व त्याच्या सहकाऱ्यांनी तारे व ग्रहांचे वय शोधण्याकरिता अ‍ॅस्ट्रोसिस्मॉलॉजी तंत्राचा वापर केला. या तंत्रात यजमान ताऱ्यात अडकलेल्या लहरींमुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक संस्पदनांचा वापर केला जातो. संशोधकांच्या मते केप्लर ४४४ ताऱ्याभोवती हे ग्रह १० दिवसांत परिभ्रमण पूर्ण करतात. हा तारा सूर्य व पृथ्वी यांच्या अंतरापेक्षा त्याच्या ग्रहांपासून एक दशांशपेक्षा कमी अंतरावर आहे. तारा या ग्रहांच्या इतका जवळ असल्याने हे ग्रह वसाहतयोग्य नाहीत व तेथे पाणी असणे शक्य नाही. शिवाय प्रारणांचे प्रमाणही जास्त आहे. पृथ्वीशी तुलना होऊ शकेल असे ग्रह खरोखर अस्तित्वात आहेत किंवा नाही याची माहिती यातून मिळू शकेल असे संशोधकांचे म्हणणे आहे. सूर्यासारख्या ग्रहाभोवती फिरणारा पृथ्वीसारखा ग्रह शोधून काढण्याच्या आपण निकट आहोत, असा दावा त्यांनी केला आहे. अ‍ॅस्ट्रॉफिजिकल जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

Story img Loader